

Narayan Lokhande Hunger Strike
भोकरदन : भोकरदन तहसील कार्यालयाच्या प्रांगणात गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेले सामाजिक कार्यकर्ते नारायण लोखंडे व विकास जाधव यांचे आमरण उपोषण अखेर प्रशासनाने दिलेल्या लेखी आश्वासनानंतर मागे घेण्यात आले. फुलंब्री येथील सामाजिक कार्यकर्ते मंगेश साबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि भोकरदनचे गटविकास अधिकारी वाय. एस. वेणीकर यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर उपोषणाची सांगता करण्यात आली. यावेळी भोकरदनचे तहसीलदार ज्ञानेश्वर काकडे हेही उपस्थित होते.
उपोषण सोडण्यापूर्वी मंगेश साबळे यांनी प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी वेगळ्या पद्धतीने आंदोलन केले. पोतराजाच्या वेशात डफ हातात घेऊन त्यांनी रस्त्यावरून तसेच तहसील कार्यालयात तांडव आंदोलन करत अधिकाऱ्यांना खडबडून जागे केले.
शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी नारायण लोखंडे व विकास जाधव यांनी हे उपोषण सुरू केले होते. विशेषतः भोकरदन पंचायत समिती अंतर्गत वैयक्तिक लाभाच्या योजनांमध्ये विहिरींच्या कामांसाठी स्थगित करण्यात आलेले मस्टर सुरू करून संबंधित लाभार्थ्यांना तात्काळ देयके अदा करावीत, अशी प्रमुख मागणी होती. तसेच प्रतिनियुक्तीवर असलेले कर्मचारी त्यांच्या मूळ पदस्थानी पाठवावेत, अशीही मागणी उपोषणकर्त्यांनी केली होती.
दि. २६ रोजी फुलंब्री येथील सामाजिक कार्यकर्ते मंगेश साबळे भोकरदन येथे दाखल झाले. त्यांनी प्रथम उपोषणकर्त्यांची भेट घेऊन परिस्थितीची सविस्तर माहिती घेतली. त्यानंतर डफ वाजवत सर्व कार्यकर्त्यांसह तहसील कार्यालयात जाऊन तहसीलदारांची भेट घेतली. उपोषणकर्त्यांच्या मागण्या व त्यावर आतापर्यंत झालेल्या कारवाईबाबत चर्चा करण्यात आली. तसेच त्यांनी पंचायत समिती कार्यालयात जाऊन गटविकास अधिकारी व संबंधित अधिकाऱ्यांशीही चर्चा करून मागण्या तात्काळ सोडवण्याची मागणी केली.
मंगेश साबळे यांच्या हस्तक्षेपानंतर प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेतली. गटविकास अधिकारी व तहसीलदारांनी स्वतः उपोषणस्थळी येऊन लेखी आश्वासन दिल्यानंतर नारायण लोखंडे व विकास जाधव यांनी आपले उपोषण मागे घेतले. यावेळी मोठ्या संख्येने सामाजिक कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते.