

Gram Sevak Corruption Allegations in Bhokardan
आन्वा : भोकरदन तालुक्यातील आन्वा गावात झालेल्या ग्रामसभेत शुक्रवारी (दि.२६) मोठी खळबळ उडाली आहे. ग्रामसभेदरम्यान ग्रामस्थांनी थेट ग्रामसेवकावर विकासकामांच्या बदल्यात 6 टक्के प्रमाणे पैसे घेतल्याचा गंभीर आरोप केला आहे.
आन्वा येथील सावता माळी मंदिर परिसरात ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गावातील नागरिकांनी विविध विषयांवर गाजली.
ग्रामसभेत उपस्थित ग्रामस्थांनी सांगितले की, गावातील विविध कामांचे देयके मंजूर करताना ठराविक टक्केवारीची मागणी केली जाते. या प्रकारामुळे गावातील विकास रखडला असून सामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्याचा आरोप करण्यात आला.
या आरोपांनंतर ग्रामसभा चांगलीच तापली असून ग्रामस्थांनी संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. तसेच दोषी आढळल्यास संबंधित ग्रामसेवकावर तात्काळ शिस्तभंगाची कारवाई करावी, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांनी केली.
दरम्यान, या आरोपांवर ग्रामसेवकाने अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र या प्रकरणामुळे पंचायत प्रशासनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून आता वरिष्ठ अधिकारी काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.