

जालना : जालना शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक प्रक्रिया निर्भय आणि पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. गत दहा दिवसात आचारसंहितेची अंमलबजावणी करणाऱ्या विविध भरारी पथकांकडून कारवाई करत सुमारे ५७ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार, उमेदवारांना प्रचारासाठी तात्पुरती कार्यालये, रॅली, सभा, मिरवणूक, लाऊडस्पीकर, वाहन परवानगी, झेंडे आणि बॅनर यांसाठी महानगरपालिका कार्यालयात एक खिडकी परवानगी कक्ष स्थापन करण्यात आला आहे. उमेदवारांनी सर्व आवश्यक परवानग्या याच कक्षातून घेणे बंधनकारक आहे.
अनेक ठिकाणी उमेदवारांच्या अस्तित्वात असलेल्या कार्यालयांवर पक्षाची चिन्हे, नावे आणि झेंडे विनापरवाना आढळत आहेत. महानगरपालिकेच्या स्वच्छता निरीक्षकांमार्फत अशा साहित्यावर कारवाई सुरू करण्यात आली आहे. यापुढेही विनापरवाना नाव किंवा चिन्हांचा वापर आढळल्यास संबंधित उमेदवारावर थेट गुन्हा दाखल केला जाईल, असे प्रशासनाने स्प केले आहे.
निवडणूक कालावधीत आदर्श आचारसंहितेचा कोणताही भंग खपवून घेतला जाणार नाही; उल्लंघन करणाऱ्यांवर तात्काळ गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
शशिकांत हदगल, निवासी उपजिल्हाधिकारी तथा आचारसंहिता कक्ष प्रमुख
प्रतिबंधक कारवाई अंतर्गत 42 केसेस दाखल करण्यात आल्या असून, 182 परवानाधारक शस्त्रे पोलीस ठाण्यात जमा करून घेण्यात आली आहेत. आचारसंहिता भंगाबाबत नागरिकांना तक्रार नोंदवण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाने 02482-223132 हा टोल फ्री क्रमांक उपलब्ध करून दिला आहे. निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी नागरिकांनी आणि उमेदवारांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन आचारसंहिता कक्षातर्फे करण्यात आले आहे.