

Jalna News: Action taken against boat engaged in illegal sand mining
जाफराबाद / टेंभुर्णी, पुढारी वृत्तसेवाः जाफ्राबाद तालुक्यातील पुर्णानदीच्या पात्रातून बोटीच्या सहाय्याने अवैध वाळू उपसा करणाऱ्यांवर महसूलच्या भरारी पथकाकडुन कारवाई करण्यात आली. या कारवाईत बोटीचे साहित्य नष्ट करण्यात आले.
जाफराबाद तालुक्यातील हनुमंतखेडा येथे मंगळवार (७) रोजी जिल्हाधिकारी अशिमा मित्तल यांच्या मार्गदर्शनाखाली जालना जिल्ह्यात महसूल विभागाने अवैध गौण खनिज (वाळू) वाहतूक करणाऱ्यांविरोधात मोठी कारवाई सुरु केली असून, या अनुषंगाने विशेष पथके स्थापन करण्यात आली आहेत.
पुर्णानदीच्या काठावरील हनुमंतखेडा या गावातून बोटीच्या सहाय्याने अवैध वाळू उपसा केला जात असल्याचे समजल्यावर पथकाने कारवाई करीत बोटींचे साहित्य नष्ट केले, तसेच जप्त करण्यात आलेला वाळूसाठा घरकुल लाभार्थ्यांना वाटप करण्यात आला.
वर्षभरात महसूल विभागाने ४९ अवैध वाहने पकडली. त्यापैकी २७वाहनांवर गुन्हे दाखल करण्यात आले. या कारवाईतून प्रशासनाने तब्बल १ कोटी १२ लाखांचा दंड वसूल केला आहे. तालुक्यात ४३ ठिकाणी पथकाने कारवाई करुन ४८९ ब्रास वाळूसाठा जप्त केला आहे.
महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना वाळू चोर चकवा देऊन पापळ तांडा मागनि हायवा मधून रातोरात परजिल्हात वाळूची चोरी करुन लाखो रुपये कमाई करत आहेत. महसूल विभागाच्यावतीने विशेष पथक तयार करून यापुढे मोठ्या प्रमाणात कार्यवाही करण्यात येईल असे टेंभुर्णी सजाचे तलाठी भिमराव ब्राम्हणे यांनी सांगितले.