

Soybean prices have collapsed, production costs have not been covered
आन्वा, पुढारी वृत्तसेवा : निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी पूर्णपणे उद्ध्वस्त होण्याची वेळ आलेली आहे. कधी अतिवृष्टी, कधी दुष्काळ तर कधी बाजारपेठेत उत्पादन केलेल्या मालाला योग्य भाव न मिळाल्यामुळे शेतकरी वारंवार अडचणीत येत आहेत. यावर्षी खरिपाच्या सुरुवातीला पेरणी योग्य पाऊस झाल्याने खरिपाची पेरणी वेळेत झाली.
सोयाबीन काढण्यासाठी तीन ते चार हजार रुपये एकरी मजुरी देऊन देखील मजूर मिळत नसल्याचे दिसते. सोयाबीन काढण्यासाठी शेतकऱ्याची चांगलीच दमछाक होत आहे. सद्यः स्थितीत बाजारात सोयाबीनला फक्त ३००० ते ३६०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळत आहे. शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही या दरात भरून निघत नाही.
त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत असून पुढील रब्बी हंगामासाठी तयारी करण्यासाठीही हातात काही उरत नाही. सोयाबीन उत्पादनात घट आणि दरात घसरण या दहेरी संकटामळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. अनेकांनी आधीच कर्ज घेतले असून ते फेडणे कठीण झाले आहे. त्यामळे राज्य शासनाने तातडीने निर्णय घेऊन आर्थिक मदत करावी अशी मागणी शेतकरी वर्गातून सातत्याने होत आहे.
अतिवृष्टीचे दुहेरी संकटः एका बाजूला काही ठिकाणी अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले आहे. यामुळे उत्पादन कमी झाले असले तरी, इतर ठिकाणी जिथे उत्पादन झाले आहे तिथे लगेच काढणी करून बाजारपेठेत माल आणला जात असल्याने दरात घसरण सुरू आहे. शेतकऱ्यांची आर्थिक गरजः अनेक शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींमुळे किंवा पिकाची साठवणूक करता येत नसल्यामुळे, सोयाबीनची विक्री तातडीने करावी लागते.
सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना यंदा मोठा आर्थिक धक्का बसला आहे. सोयाबीनच्या दरात घसरण झाल्यामुळे शेतकऱ्यांचा लागवडीचा खर्चही निघणार नाही अशी स्थिती उद्भवली आहे. अतिवृष्टीच्या पावसामुळे खरिप हंगामच वाया गेला आहे. पुन्हा रब्बी हंगामपेरणी करण्यासाठी कर्ज काढण्याची वेळ शेतकरी यांच्यावर आली आहे.