

Labor is not available for harvesting soybeans
घनसावंगी, पुढारी वृत्तसेवाः तालुक्यातील अनेक गावांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे सोयाबीन पीक अक्षरशः जमिनीत झोपले आहे. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे स्वप्न पाण्यात गेले आहे. "हातातोंडाशी आलेला घास निसर्गान हिरावून घेतला असतांनाच वाचलेले पिक पदरात पाडुन घेण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू आहे. सोयाबीन काढणीसाठी मजुरांची टंचाई निर्माण झाली असतांनाच एकरी पाच ते सहा हजार रुपये मोजुन शेतकऱ्यांना धडपड करावी लागत आहे.
गेल्या आठवड्याभरात पावसाने विश्रांती घेतली असली तरी ओलसर जमिनीत उभ्या असलेल्या सोयाबीन शेंगा कुजण्यास सुरुवात झाली आहे. हवामानातील अनिश्चिततेमुळे आणि सततच्या आर्द्रतेमुळे पिकावर बुरशीचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना तातडीने काढणी करणे आवश्यक आहे. सोयाबीन काढणी सुरु झाल्याने गावोगावी मजूर मिळणे कठीण झाले आहे.
शेतकऱ्यांना मजुरीसाठी दिवसाला ५ ते ६ हजार रुपयांपर्यंत खर्च येत असून, एवढा खर्च परवडत नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी कुटुंबासह शेतात उतरून काढणी सुरू केली आहे. अतिवृष्टीतही शेतकऱ्यांचे हात खचलेले नाहीत. सोयाबीन काढणीसाठी घरातील महिला, तरुण मुले-मुली हातभार लावत आहेत. पिकाचे क्षेत्र मोठे असल्याने सर्व काम वेळेत पूर्ण होणे अवघड ठरत आहे.
संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना शासनाकडून काही मदत मिळते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मजुरीचा खर्च, बियाण्यांचा व खतांचा वाढलेला दर, आणि बाजारात भाव घसरल्याने शेतकऱ्यांवर संकट कोसळले आहे. अनेक ठिकाणी सोयाबीन शेंगा फुटल्याने सोयाबीनला भावही मिळत नाही.