

शहागड: घनसावंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रांजणी गावात पोलिसांनी धाड टाकून तब्बल १ लाख ८० हजार ६३० रुपयांचा प्रतिबंधित गुटखा आणि सुगंधित तंबाखू जप्त केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी मुद्देमाल जप्त करत पुढील कायदेशीर कारवाई सुरू केली आहे.
अंबडचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सिद्धेश्वर धुमाळ यांना रांजणी गावात अवैध धंदे सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक किरण पवार, पथक प्रमुख बाबा डमाळे, पोलीस कर्मचारी जाधव, राऊत, लोखंडे आणि महिला पोलीस नाईकवाडी यांच्या पथकाने गुरुवारी सकाळी रांजणी येथील बाजार भागात छापा टाकला. पथकाने संशयित आरोपी अफरोज जानी मियाँ बागवान (रा. बाजार रांजणी, ता. घनसावंगी) याच्या राहत्या घराची आणि परिसराची झडती घेतली. पोलिसांची चाहूल लागताच आरोपीने महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटख्याच्या गोण्या घरासमोरील मोकळ्या जागेत फेकून दिल्या होत्या. मात्र, पोलिसांनी त्या शोधून काढल्या.
झडतीदरम्यान पोलिसांना खालील मुद्देमाल मिळून आला:
गोवा गुटखा: ३७५ पाकिटे
हिरा पान मसाला: ३६० पाकिटे
इतर साहित्य: जाफराणी जर्दा, हिरा ७१७, ३६० गुटखा
एकूण किंमत: ₹१,८०,६३०/-
हा सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, आरोपीविरुद्ध घनसावंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या धडक कारवाईमुळे परिसरातील अवैध गुटखा विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत.