

Purna illegal slaughterhouse
पूर्णा : शहरातील आवेश कॉलनी परिसरातील एका कत्तलखान्यावर परभणी पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकाने मंगळवारी (दि. १९) पहाटे ६.४५ वाजण्याच्या सुमारास छापा टाकून मोठी कारवाई केली. या कारवाईत कत्तलीसाठी आणण्यात आलेले सात बैल, गोवंश मांस, कत्तलीचे साहित्य, मोबाईल व रोकड असा सुमारे ३ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
छाप्यात एका बैलाची कत्तल करण्यात आल्याचे उघड झाले असून त्याचे मांसही घटनास्थळी आढळून आले. तसेच जिवंत अवस्थेतील सात बैल ताब्यात घेऊन त्यांना पुढील कार्यवाहीसाठी गोशाळेत पाठविण्यात आले.
ही कारवाई पोलिस अधीक्षक कुमावत यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पोलिस पथकाने केली. याप्रकरणी विशेष पथकातील अधिकारी गोविंद संभाजी चुडावकर यांनी पूर्णा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून शेख रहेमान शेख नूर, शेख मुजीब शेख रहेमान, शेख रफीक शेख जलाल आणि शेख इब्राहिम शेख अब्दुल गणी (सर्व रा. विजयनगर, पूर्णा) यांच्याविरुद्ध महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियमासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कारवाईदरम्यान पोलिसांनी विविध जातींचे सात बैल, अंदाजे ९६.५ किलो गोवंश मांस, मुंडके, खुर, आतडी तसेच कत्तलीसाठी वापरण्यात येणाऱ्या कुऱ्हाडी, लोखंडी सुरी, वजन काटा, मोबाईल आणि रोख रक्कम जप्त केली. जप्त मुद्देमालाची एकूण किंमत सुमारे ३ लाख १५ हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.
या प्रकरणाचा पुढील तपास सपोनि गजानन पाटील हे पोलिस अधीक्षक कुमावत, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. समाधान पाटील आणि पोलिस निरीक्षक विलास गोबाडे यांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहेत.
दरम्यान, पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकाने केलेल्या या धाडसी कारवाईमुळे अवैध जनावरांची कत्तल व मांस विक्री करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून, पुढील काळातही विविध अवैध धंद्यांविरोधात अशाच धडक कारवाया सुरू राहणार असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.