

जालना ः जालना महानगर पालिकेच्या ऐतिहासिक सत्तेसाठी आज गुरूवार दि. 15 रोजी मतदान पार पडले. 16 प्रभागातून 65 उमेदवार निवडूण द्यायचे आहेत. नागरिकांनी उत्स्फूर्तपणे आपला मतदानाचा हक्क बजावला. सुमारे 454 उमेदवारांचे भवितव्य आज मतपेटीत बंद झाले आहे.
दरम्यान, तब्बल 9 वर्षानंतर जालना महानगर पालिकेची निवडणूक झाली. पहिल्या वहिल्या महापालिकेच्या निवडणुकीसाठी सत्तेच्या सारीपाटावर सर्वच पक्षांनी आपले उमेदवार उभे केले. जालना शहर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मंगळवारी शहरातील एकूण 291 मतदान केंद्रांवर शांततेत व उत्साहपूर्ण वातावरणात मतदान प्रक्रिया पार पडली. सकाळी 7.30 वाजेपासून सुरू झालेल्या या मतदान प्रक्रियेत शहरातील मतदारांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत चाललेल्या मतदानानंतर 454 उमेदवारांचे राजकीय भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे.
महानगरपालिकेच्या 65 जागांसाठी ही निवडणूक पार पडली असून, यामध्ये महायुतीच्या घटक पक्षांनी स्वबळाचा नारा दिला. भाजपाने 63 उमेदवार उभे केले होते. तर शिवसेना शिंदे गट, अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीने देखील आपले उमेदवार निवडणुकीच्या मैदानात उतरवले. महाविकास आघाडीने आपल्या घटक पक्षांना सोबत घेत निवडणुकीत उडी घेतली. या निवडणुकीत सुमारे 152 अपक्ष उमेदवारांनी देखील आपले भवितव्य आजमावले.
सत्ताधारी आणि विरोधी पक्षांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरली असून, अनेक प्रभागांमध्ये दुरंगी, तिरंगी तसेच चौरंगी लढती पाहायला मिळाल्या. त्यामुळे निकालाबाबत राजकीय वर्तुळात कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे.
मतदान प्रक्रियेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता. प्रत्येक मतदान केंद्रावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मतदान केंद्रांवर अतिरिक्त पोलीस कुमक व सीसीटीव्हीच्या माध्यमातून लक्ष ठेवण्यात आले. निवडणूक निरीक्षक, जिल्हा प्रशासन व पोलीस यंत्रणेने दिवसभर मतदान केंद्रांना भेटी देत परिस्थितीचा आढावा घेतला.
ज्येष्ठ नागरिक, महिला व दिव्यांग मतदारांसाठी विशेष सोयी उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. अनेक मतदान केंद्रांवर मतदारांच्या सोयीसाठी व्हीलचेअर, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तसेच स्वयंसेवकांची मदत उपलब्ध होती. सकाळच्या सत्रात मतदानाचा वेग काहीसा मंद होता; मात्र दुपारनंतर मतदारांची गर्दी वाढल्याचे चित्र दिसून आले. विशेषतः संध्याकाळच्या सत्रात तरुण मतदारांचा सहभाग लक्षणीय ठरला.
आता सर्वांचे लक्ष मतमोजणीकडे लागले असून, कोणाचा झेंडा महापालिकेवर फडकणार, सत्तेची गणिते कोणाच्या बाजूने झुकणार, याचा फैसला लवकरच होणार आहे. मतदानानंतर उमेदवार, कार्यकर्ते व नागरिकांमध्ये निकालाबाबत विविध तर्क-वितर्कांना उधाण आले असून, जालना शहराच्या राजकीय दिशेचा निर्णय मतमोजणीतून स्पष्ट होणार आहे.
बोगस मतदान करण्याचा प्रयत्न हाणून पाडला
शहरातील डबल जीन येथील प्रभाग क्रमांक 9 मधील महानगरपालिका शाळेमध्ये बोगस मतदान करण्याचा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडला. दरम्यान, हा प्रकार उमेदवाराच्या प्रतिनीधीच्या लक्षात आल्याने त्याने त्या व्यक्तीसोबत गोंधळ घातला. आणि मतदान करण्यास अटकाव केल्या. यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी अनंत कुलकर्णीयांनी तात्काळ हस्तक्षेप करत बोगक मतदान करणाऱ्या व्यक्तीला त्याच्या वडिलांचे नाव विचारले असता तो गांगारुन गेला. यामुळे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. तो त्रिंबक कडूबा देठे या मतदाराच्या नावाने मतदान करण्यासाठी मतदान केंद्रात आला होता. या प्रकारानंतर पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला.
या ठिकाणी होणार मतमोजणी
महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभागनिहाय वार्डाची मतमोजणी दि. 16 रोजी सिद्दिकी इंजीनियरिंग जुनी मे. सरस्वती ऑटो कम्पोनंटस प्रा. लि. प्लॉट नं. बी 8/1 जालना फेज 3, एमआयडीसी इंडंस्ट्रियल एरिया जालना येथे होणार आहे. मतमोजणी सकाळी 10 वाजल्यापासून 16 प्रभागासाठी मतमोजणी केली जाणार आहे.
मतदानासाठी दीड मिनिटाचा वेळ
महानगर पालिका निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी व्हीव्हीपॅटवर चार उमेदवारांना मतदान करावे लागल्याने वयोवृध्दांना सुमारे दीड मिनिटाचा वेळ लागला. बऱ्याच ठिकाणी वयोवृध्दांना मतदान करण्याचे लक्षात येत नसल्याने त्यांचा गोंधळ उडाला. यावेळी मतदान केंद्राध्यक्ष यांची मदत घ्यावी लागली.
मोबाईल ठेवले बाहेर
महानगर पालिकेच्या निवडणुकेच्या मतदानासाठी मतदान केंद्रावर सुरक्षास्तव मोबाईल आणण्यास बंदी घालण्यात आली होती. मात्र, बंदी असून देखील काही मतदारांनी मतदान केंद्रावर मोबाईल बाळगला होता. यामुळे पोलिस प्रशासनाने त्यांची झडती घेवून मोबाईल मतदान केंद्रा बाहेर ठेवले. सुरक्षेला बाधा पोहचू नये म्हणून मोबाईलची झडती घ्यावी, अशी तंबी पोलिस अधीक्षक अजयकुमार बंन्सल यांनी सेंट मेरी हायस्कुल येथील मतदान केंद्रावरील कर्मचाऱ्यांना दिली.
मतदान करुन घेण्यासाठी उमेदवाराची धावपळ
सकाळी साडे सात वाजता मतदानाला सुरूवात झाली. मतदान शांततेत पार पडले. मात्र, मतदान करुन घेण्यासाठी सर्वच पक्ष, अपक्ष उमेदवारांची चांगलीच धावपळ पाहायला मिळाली. उमेदवारांसह कार्यकर्ते घरोघरी जावून मतदारांना मतदान करण्याचा आग्रह करीत असल्याचे पाहायला मिळाले.
टपाली मतपत्रिका मोजणीपासून सुरुवात
मे. सिद्दिकी इंजिनिअरिंग, बी 8/1, औद्योगिक वसाहत फेज 3, छत्रपती संभाजी नगर रोड, जालना येथे सुरू होणार आहे. प्रभाग 1 ते 12: प्रत्येक निवडणूक निर्णय धिकाऱ्याकडे 3 प्रभाग सोपवण्यात आले असून, प्रत्येकी 6 टेबल लावण्यात आले आहेत. प्रभाग 13 ते 16: या प्रभागांच्या मतमोजणीसाठी 8 टेबल लावण्यात आले आहेत. सुरूवात निवडणूक निर्णय अधिकारी 1 (प्रभाग 1), अधिकारी 2 (प्रभाग 4), अधिकारी 3 (प्रभाग 7), अधिकारी 4 (प्रभाग 10) आणि अधिकारी 5 (प्रभाग 13) या क्रमाने मतमोजणीला प्रारंभ होईल.