मुंबई : पागडी भाडेकरूंच्या मागण्यांवर सरकारने निर्णय न घेतल्यास मतदान न करण्याची भूमिका घेत 10 डिसेंबरपासून आम्ही रस्त्यावर उतरू, असा इशारा पागडी एकता संघाचे अध्यक्ष मुकेश शाह-पेंडसे यांनी मंगळवारी आझाद मैदानात महाआंदोलनावेळी दिला. या आंदोलनात मुंबईतील हजारो पागडीधारक सहभागी झाले होते.
बोरीवलीपासून चर्चगेटपर्यंत हजारो पागडी भाडेकरूंनी पागडी एकता संघाच्या नेतृत्वाखाली एकत्र येत आझाद मैदानात ओदोलन केले. 1960 पूर्वीच्या जुनाट, जीर्ण आणि असुरक्षित इमारतींमध्ये दशकानुदशके राहणाऱ्या मुंबईकरांचा उद्रेक यावेळी दिसून आला.
1960 पूर्वी बांधलेल्या सर्व इमारतींना मनुष्य वसाहतीस अयोग्य घोषित करणारा एकसंध जीआर तत्काळ काढावा, म्हाडाने तयार केलेला अन्यायकारक एसओपी तत्काळ रद्द करावा या प्रमुख मागण्यांसह अन्य मागण्या यावेळी करण्यात आल्या.
पुनर्वसन एकमेव उपाय जीआर पास करा, जीव वाचवा अशा आशयाचे फलक यावेळी आंदोलकांनी झळकवले. आम्हाला आश्वासने नको; आता प्रत्यक्ष निर्णय हवा अशा घोषणा देण्यात आला. जनता आता अन्याय सहन करणार नाही, अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या.
यावेळी पागडी एकता संघाचे अध्यक्ष मुकेश शाह-पेंडसे म्हणाले, दशकानुदशके पागडी भाडेकरूंना फक्त वचने आणि आश्वासने मिळाली. पण, हा काळ बदलला आहे. आजचा प्रचंड प्रतिसाद दाखवून देतो की, जनता जागी झाली आहे. आता ती मागे हटणार नाही. सरकारने 6 डिसेंबर 2025 पर्यंत ठोस निर्णय घेतला नाही तर 10 डिसेंबरपासून आम्ही रस्त्यावर उतरणार आहोत.
मुंबईत भव्य रोड शोद्वारे लाखो पागडी भाडेकरू आपला आवाज तीव्रपणे आणखी तीव्रपणे उठवतील. आजचे शांत, शिस्तबद्ध महाआंदोलन ही फक्त सुरुवात आहे. प्रत्येक पागडी भाडेकरूला सुरक्षित, सन्मानजनक आणि स्थिर घर मिळेपर्यंत ही लढाई सुरूच राहील.
अन्य मागण्या :
एमसीजीएम लीज इमारतींमधील पागडी भाडेकरांचे हक्काचे संरक्षण व्हावे.
औपचारिक रहिवाशांची यादी जाहीर करा.
पुनर्विकाससाठी सिंगल विंडो प्रणाली सुरु करा.
नॉन सेस पागडी इमारतीसाठी स्वतंत्र विशेष जीआर काढा.