

Jalna Municipal Corporation's smart roadmap; the District Collector interacts with the corporators
जालना, पुढारी वृत्तसेवा :
जालन्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी एक परिवार म्हणून काम करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा मनपा आयुक्त आशिमा मित्तल यांनी केले.
जालना शहर महानगरपालिकेच्या नवनिर्वाचित सदस्यांचा परिचय आणि शहराच्या विकासासाठी एक सामायिक दृष्टीकोन तयार करण्याच्या उद्देशाने गुरुवार दि. २२ रोजी महसूल भवन येथे विशेष संवाद बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हाधिकारी तथा आयुक्त आशिमा मित्तल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत शहराच्या समस्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली असून, जालन्याला स्टील आणि कृषी उद्योगांच्या बळावर एक आदर्श शहर बनवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
बैठकीच्या सुरुवातीला सर्व नवनिर्वाचित सदस्यांचे पुष्प आणि वैयक्तिक डायरी देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी सदस्यांनी शहराच्या विकासासाठी विविध महत्त्वाच्या सूचना मांडल्या. संध्या देठे यांनी महिला सदस्यांसाठी कामकाज प्रशिक्षणाची मागणी केली, तर अक्षय गोरंट्याल यांनी प्लास्टिक बंदी आणि स्वच्छता रैंकिंग सुधारण्यावर भर दिला. दर्शना झोल यांनी जन्मापासून मृत्यूपर्यंतच्या सेवा सक्षम करण्याची गरज व्यक्त केली.
शशिकांत घुगे यांनी ५ वर्षांचा डिपीआर तयार करण्याची संकल्पना मांडली, तर राजेश राऊत यांनी उत्पन्न वाढीसाठी शॉपिंग कॉम्प्लेक्स उभारण्याची सूचना केली. आयुक्त आशिमा मित्तल यांनी महानगरपालिकेच्या कामकाजात पारदर्शकता आणि शिस्त आणण्यासाठी महत्त्वाच्या घोषणा केल्या.
"आता ही नगर परिषद नसून महानगरपालिका आहे, त्यामुळे कामाची पद्धत बदलावी लागेल," असे त्यांनी स्पष्ट केले. यापुढे कोणालाही फायली घेऊन फिरता येणार नाही, सर्व कामे नियमानुसार होतील. दर शुक्रवारी दुपारी ३:३० ते ४:३० या वेळेत शहरात स्वच्छता मोहीम राबवली जाणार असून, सर्वात स्वच्छ प्रभागाला विशेष पारितोषिक देऊन गौरविण्यात येईल, असेही त्यांनी जाहीर केले.
मनपाच्या आगामी प्रकल्पांची माहिती
सौर ऊर्जा : १५ मेगावॅटचा सौर ऊर्जा प्रकल्प उभारला जाणार आहे. आरोग्य : नागरी आरोग्य केंद्रांची संख्या ७ वरून २३ पर्यंत वाढवण्यात आली आहे. स्वच्छता : नागपूरच्या एजन्सीसोबत घनकचरा व्यवस्थापनाचा करार झाला असून सांडपाणी प्रकल्प मार्च अखेर कार्यान्वित होईल. सुशोभीकरण : मोतीबाग येथे सनसेट पॉईंट आणि नवीन उद्यानांची निर्मिती केली जाणार आहे.