

जालना, पुढारी वृत्तसेवा : नुकताच जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारलेल्या श्रीमती आशिमा मित्तल यांनी सोमवार दि.८ रोजी जालना शहर महानगरपालिकेच्या कारभाराची झाडाझडती घेतली. अधिकाऱ्यांसोबत पहिली आढावा बैठक घेऊन शहराच्या विकासासह नागरिकांना देण्यात येणाऱ्या मूलभूत सोयी सुविधांविषयी विविध महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा केली.
बैठकीत शहरातील स्वच्छता, पावसाळ्यातील पाण्याचा नीट न होणारा निचरा, वाढलेले अतिक्रमण, बऱ्याच दिवसांपासून प्रलंबित घरपट्टी व नळपट्टीची वसुली, तसेच मोती बाग परिसरात स्वच्छता व सौंदर्याकरण या विषयांवर विशेष भर देण्यात आला.
शहरातील रस्त्यांच्या कडेला आणि दुभाजकांमध्ये वाढलेल्या झाडांमुळे शहर विद्रूप दिसत असल्याने तातडीने त्यांची साफसफाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी श्रीमती आशिमा मित्तल यांनी दिले. छत्रपती संभाजी महाराज उद्यान परिसरात स्वच्छतेसोबतच सौंदर्याकरणाचे कामही करण्यावर भर देण्यात आला.
शहरातील ठिकठिकाणी पडलेल्या कचऱ्याचे ढीग व प्लास्टिकचे प्रमाण पाहता, केवळ पालिकेने नव्हे तर नागरिकांनीही जनजागृती करून पुढाकार घ्यावा, असे आवाहन करण्यात आले. नागरिकांकडे प्रलंबित असलेली घरपट्टी व नळपट्टी वसूल करण्यावर भर देण्यात आला. वसुली न झाल्यास प्रकरणे लोकअदालतामध्ये पाठवण्याचेही निर्देश देण्यात आले.
शहरातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी रस्त्याच्या कडेला झालेली अतिक्रमणे तातडीने काढण्याबाबत चर्चा झाली. शहराला लागून असलेल्या औद्योगिक वसाहतीतून होणारे प्रदूषण मोठ्या प्रमाणात शहरात येत असल्याने लहान मूलं व वृद्ध नागरिकांना त्रास होत असल्याचे निदर्शनास आले. त्यावर उपाययोजना करण्याबाबतही चर्चा झाली. या बैठकीस महानगरपालिका आयुक्त संतोष खांडेकर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
शहराच्या स्वच्छतेसाठी 'स्वच्छता अॅप'
शहरात कचरा साचला असेल, अशा ठिकाणचे फोटो स्वच्छता अॅपवर टाकल्यास महापालिका यावर त्वरित अॅक्शन घेऊन कचऱ्याची विल्हेवाट लावणार आहे. या संदर्भात लवकरच केंद्र शासनाच्या स्वच्छता अॅपचा शुभारंभ होणार आहे. नागरिकांनी कचऱ्याचे फोटो या अॅपवर अपलोड केल्यास पालिका तत्काळ कारवाई करेल. स्वच्छ व सुंदर शहर बनवण्यासाठी जालना महापालिका आग्रही भूमिका बजावणार आहे. शहर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी प्रशासनाबरोबरच नागरिकांचीही आहे. नागरिकांनीही आपले कर्तव्य पार पाडावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.