

Jalna Ganesh Festival Folk Lok
जालना, पुढारी वृत्तसेवा : फोल्क लोक' ने गण, अभंग, पोवाडा, भारुड, गोंधळ गीत, लावणी सादर करत जालना गणेश फेस्टिव्हलमध्ये नवीन पिढीला विसर पडत चाललेल्या लोकसंगीताचे दान देत माय मराठीचे गुणगानही केले.
महाराष्ट्रभर गाजत असलेल्या 'फोल्क लोक' या लोकगिताच्या कार्यक्रमाने रौप्य महोत्सवी वर्षातील जालना गणेश फेस्टिव्हलची सांगता झाली. शौनक कुलकर्णी यांनी सादर केलेल्या' अंबिका माय' या घाटोळीला रसिकांनी दाद दिली. ही घाटोळी वन्स मोअर झाली. ईश्वरी बाविस्कर हिने सादर केलेल्या 'सात समुदर आटले गं बाई आईच्या आंघोळीला' हे लोकगीत महिला रसिकांची दाद घेऊन गेले. 'गण बाई मोगरा' हे भारुडही रसिकांची दाद घेऊन गेले. सुबोध कोटेकर याने सादर केलेले ' पिवळा रंग पाहूनिया दंग झालो मल्हार' हा अंभग रसिकांना मंत्रमुग्ध करून गेला.
ईश्वरी बाविस्कर हिने' गार डोंगराची हवा' हे भारुड तसेच' गजर हरी नामाचा' हा अभंग सादर केला. या कार्यक्रमात' फोल्क लोक'ने महाराष्ट्रातील पारंपरिक लोकगीतेही सादर केली. शौनक कुलकर्णी, सुवोध कोटेकर, मुकुल शिगांडे, ईश्वरी बाविस्कर, हृषाली कालेकर यांनी लोकगीते सादर केली. त्यांना सई जोशी व सौरभ यांनी साथ दिली.
ओमकार जोशी, सक्षम जाधव, मुकुंद कोंडे, कौस्तुभ सोन वणे यांनीही तालवादक म्हणून लोकगितांना साथ दिली. तसेच सई जोशी, सिध्दांत कांबळे, भशंतनू डिघे यांनी सुरवादक म्हणून साथ दिली. सिध्दांत उमरीकर यांच्या बासरीवादनाने रसिकांना मंत्रमुग्ध केले. शिवकुमार गायकवाड, धनंजय डिघे यांची बतावनीही लक्षवेधी ठरली. यावेळी जालना गणेश फेस्टिव्हलच्या वतीने संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय लाखे पाटील, अध्यक्ष अशोकराव आगलावे, कार्याध्यक्ष भाऊसाहेब घुगे उपस्थित होते.
शौनक कुलकर्णी व सुबोध कोटेकर यांनी सादर केलेले 'पड रं पाण्या, पड रं पाण्या भिजवी जमीन, शेत माझं लयी तान्हेलं चातकावानी' हे शेतकरी गीत रसिकांची दाद घेऊन गेले. पृथा केंगारे यांनी 'तुझ्या ऊसाला लागल कोल्हा व कुणा कुणाला वाटे वाईट वर्तन' या लावणीवर केलेल्या नृत्यावर रसिकांनी ठेका धरला.