

जालना : जालना शहर महानगरपालिका प्रशासनामार्फत शहरातील अनधिकृत बांधकामे आणि अतिक्रमण हटाव मोहिमेला सातत्याने गती देण्यात येत आहे. आयुक्त श्रीमती अंजली शर्मा यांच्या थेट निर्देशानुसार शहरातील सार्वजनिक रस्ते, पदपथ व वाहतुकीस अडथळा निर्माण करणारी अतिक्रमणे हटविण्याच्या अनुषंगाने महानगरपालिका अतिक्रमण विभागामार्फत शनिवार(२९) रोजी भाग्य नगर येथील उड्डाणपुलाखाली विशेष मोहीम राबवून १९ अतिक्रमणे काढण्यात आली.
जालना शहरातील विविध रस्त्यातवर मोठ्या संख्येने फेरीवाले, व्यावसायीक व नागरीकांनी अतिक्रमण केले आहे. यामुळे शहरातील रस्ते अरुंद झाले आहेत. या पार्श्वभूमीवर शहरातील विविध भागात महानगरपालिकेच्यावतीने अतिक्रमणांवर कारवाई करून रस्ते व पदपथ मोकळे केले जात आहे.
शनिवारी अंबड रोड उड्डाणपुलाखालील १९ अतिक्रमणांवर महापालिकेने कारवाई करीत रहदारीस अडथळा निर्माण करणाऱ्या टपऱ्यासह इतर अतिक्रमण जेसीबीच्या सहाय्याने काढण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने नागरिकांनी गर्दी केली होती.
अतिक्रमण हटविण्याची कारवाई सहायक आयुक्त विजय फुलंब्रीकर यांच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी अतिक्रमण विभागप्रमुख शोएब खान, स्वच्छता विभागप्रमुख सुधीर डहाळे, अतिक्रमण विभागातील कर्मचारी शुभम जाधव, राहुल हिवाळे, मॅथ्यू चॉको, फेरोज बेग, कादर खान,. तुषार लोखंडे, सचिन ढवळे, राधेश्याम लोखंडे, विक्रांत कीर, रावसाहेब लोखंडे, आशिष गायकवाड, फेरोज बेग, सचिन जाधव , मंगेश साठे, अरुण वानखेडे यांच्यासह स्वच्छता निरीक्षक यांच्यासह महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुन्हा अतिक्रमण केल्यास दंडात्मक कारवाई
महानगरपालिका प्रशासनाने यावेळी स्पष्ट व कडक इशारा दिला आहे की, ज्या ठिकाणी आज अतिक्रमण हटविण्यात आले त्या ठिकाणी पुन्हा अतिक्रमण आढळून आल्यास संबंधितांवर महाराष्ट्र महानगरपालिका कायद्यानुसार कठोर कायदेशीर व फौजदारी कारवाई करण्यात येईल. तसेच अतिक्रमण हटविण्यासाठी प्रशासनाला आलेला संपूर्ण खर्च संबंधित अतिक्रमणधारकांकडूनच वसूल केला जाईल.