

वडीगोद्री : मराठा आरक्षणाच्या प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी शनिवारपासून (दि. २९) जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे बेमुदत उपोषणाला सुरूवात केली. यावेळी ही आपली ‘शेवटची आणि निर्णायक लढाई आहे, समाजाने एकजुटीने या लढाईत उभे राहावे’ अशी भावनिक साद घालत त्यांनी सरकारला १२ सप्टेंबर पर्यंत अल्टिमेटम दिला. १२ सप्टेंबरपर्यंत मागण्या मान्य न झाल्यास अंतरवालीतून थेट मुंबईला निघू असा इशाराही त्यांनी दिला.
पात्र मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्रे देणे, जात पडताळणी समिती रद्द करणे आणि आरक्षणासंदर्भातील प्रलंबित प्रश्न मार्गी लावणे, या प्रमुख मागण्यांसाठी जरांगे यांनी शनिवारपासून अंतरवाली सराटी येथे उपोषणाला सुरूवात केली. यावेळी हजारो मराठा बांधव अंतरवालीत दाखल झाले आहेत.
जात पडताळणी समित्याच बरखास्त करा
जात वैधता प्रक्रियेत राजकीय हस्तक्षेप नाही, असे सरकारकडून केवळ बोलले जाते; प्रत्यक्षात परिस्थिती वेगळी आहे. सरकार जाणूनबुजून एका अधिकाऱ्याकडून दुसऱ्या अधिकाऱ्याकडे जबाबदारी ढकलत असून त्याचा फटका मराठा समाजाला बसतो आहे. महाराष्ट्र राज्यात जात पडताळणी समित्या आहेत. देशात इतरत्र कुठेच त्या नाहीत, अशी माहिती राधाकृष्ण विखे यांनीच दिली होती, त्यामुळे त्या बरखास्त करा, असे म्हणत मराठा-कुणबी प्रमाणापत्र दिल्यानंतर जात पडताळणी समित्यांमध्ये ही प्रमाणपत्र जाणीवपूर्वक रद्द केली जात असल्याचा गंभीर आरोप देखील जरांगे यांनी केला आहे.
एकनाथ शिंदे आणि भाजपमध्ये श्रेयाची लढाई ?
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढे जातील, या भीतीने किंवा श्रेयासाठी सरकारमध्ये लढाई सुरू असून या श्रेयाच्या लढाईत मराठा समाज भरडला जात आहे. एकनाथ शिंदे यांनी ५८ लाख नोंदी असल्याचे सांगितले आणि आता भाजपकडून नोंदी नाहीत, असे सांगितले जाते ‘मग आम्हाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी फसवले असे सांगायचे का?’ असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. एकनाथ शिंदे आणि भाजपचे मंत्री आपल्याला भेटत आहेत; त्यामुळे आपण मराठा समाजाचे नुकसान कसे करू, असेही जरांगे म्हणाले.