

अप्पासाहेब खर्डेकर
जालना ः महापालिका निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. अवघे पाच दिवस मतदानाला शिल्लक राहिल्याने सर्वच पक्षाच्या उमेदवारांनी कंबर कसली आहे. कमी वेळेत अधिकाधिक मतदारांपर्यंत उमेदवाराचे नाव व चिन्हे पोहोचविण्यासाठी प्रचारफेरी सोबतच आता हायटेक प्रचाराला प्राधान्य दिले जात आहे.
निवडणूक म्हटली म्हणजे प्रचार आलाच. पूर्वपरंपरागत पद्धतीनुसार घरोघरी भेटी देऊन हात जोडत मतदान करण्याची विनंती करत प्रचार केला जातो. त्याही पुढे जाऊन आता पत्रक (प्रॉस्पेक्ट ) तयार करून त्याद्वारे घरोघरी केलेली कामे आणि करावयाच्या कामांचा जाहीरनाम्यासह उमेदवाराचे छायाचित्र व पक्षाचे चिन्ह छापून वाटप केले जातात. तर कॉर्नर सभा, जाहीर सभा हा शेवटचा टप्पा ठरलेला असतो. मात्र हल्ली निवडणुकीसाठीही कालमर्यादा कमी झाली आहे.
वेळ कमी आणि प्रभाग परिसर मोठा, त्यात मतदार संख्या वाढल्याने निवडणुकांत चुरस वाढली आहे. परिणामी उमेदवारांना मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यात सर्वसामान्य उमेदवारांपुढे तर खर्चाबाबतही तजबिज नसल्याने जेवढे होईल तेवढे घरभेटीद्वारे प्रचार करीत आहेत. राजकारणात मुरलेले, राजकीय परंपरा असलेले आणि आर्थिक स्थिती चांगली असलेले उमेदवार मात्र हायटेक प्रचाराकडे वळले आहेत.
सर्वच पक्ष स्वबळावर लढत असल्याने यंदा महापालिकेच्या निवडणुकीत अतिशय चुरस दिसून येत आहे. कारण प्रत्येक उमेदवार घरोघरी जाऊन मतदाराचा आशीर्वाद घेताना दिसत आहे. येत्या 16 जानेवारी रोजी कोणाला आशीर्वाद मिळतो ते कळणार आहे.
भोंग्याचा वापर वाढला
महापालिकेच्या निवडणुकीत प्रचारात भोंग्यांचा प्रभावी वापर करण्यात येत आहे. सकाळी, दुपारी, संध्याकाळी आपापल्या प्रभागात रिक्षावर भोंगे लावून मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केल्या जात आहे. शहरातील सोळाही प्रभागांत प्रचाराचा जोर वाढला आहे. गल्लीबोळातील प्रचारासाठी भोंग्यांंचा वापर करण्यात येत आहे. शहरातील वातावरण निवडणूकमय झाले आहे. मुख्य रस्त्यासह गल्ली-गल्लीतील भोंगे घेऊन फिरणारे रिक्षा दिसून येत आहे. प्रचारफेरी काढण्यात येत आहे.
88 वाहने, 40 रिक्षा तैनात
शहरात 88 वाहने, 40 रिक्षांच्या माध्यमातून गल्लोगल्ली जाऊन प्रचार करण्यात येत आहे. सकाळी प्रचार रॅलीच्या माध्यमातून मतदारांना गळ घालण्यात येत आहे.
सोशल मीडियावर युध्द सुरू
प्रत्येक पक्षाच्यावतीने शहरातील स्थानिक नागरिकांच्या समस्या, अडीअडचणी, विकास कामे आदींसह सहानुभूती निर्माण करण्यात येत आहे. सोशल माध्यमांवर निवडणुकीचे युध्द सुरू आहे.