

जालना : जालना महापालीकेत स्वीकृत सदस्यांची निवड शुक्रवार(6) रोजी होत आहे.या निवडीवरून काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेभाऊ देशमुख व महापालिकेतील काँग्रेसचे गटनेता फारुक तुंडीवाले यांच्यातील वाद पेटला आहे.
गटनेता तुंडीवाले यांनी जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांच्याशी चर्चा न करता परस्पर स्वीकृत सदस्यासाठी विनोद रत्नपारखे यांच्या नावांचा प्रस्ताव दिला असून सदर प्रस्ताव रद्द करण्याची मागणी काँग्रेस जिल्हाध्यक्ष राजेभाऊ देशमुख यांनी आयुक्तांकडे केली आहे.
काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेभाऊ देशमुख यांनी आयुक्तांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, 2 मार्च रोजी काँग्रेस पक्षाच्या वतीने स्वीकृत सदस्यासंदर्भात काँग्रेसच्या पक्ष गटनेत्यांमार्फत एक प्रस्ताव सादर करण्यात आलेला आहे. सदर प्रस्ताव हा पक्षाच्या अधिकृत मान्यतेशिवाय व जिल्हाध्यक्षांच्या परवानगीविना सादर करण्यात आला असून तो अनधिकृत आहे.
काँग्रेस पक्षातर्फे स्वीकृत सदस्य पदासाठी अब्दुल अजिज आबुद बिन सामेदा यांचे नाव निश्चित करण्यात आले होते. मात्र गटनेता फारुक तुंडीवाले यांनी भाजप तर्फे महानगर पालिकेची निवडणूक लढवलेले उमेदवार विनोद रत्नपारखे यांचे नाव काँग्रेसच्यावतीने स्विकृत सदस्यपदासाठी सादर केले. त्यामुळे विनोद रत्नपारखे यांचे नाव अनधिकृत असल्याचे देशमुख यांनी म्हंटले आहे.
काँग्रेस पक्षाच्या संघटनात्मक नियमावलीनुसार अशा प्रकारचा प्रस्ताव सादर करण्यापूर्वी जिल्हाध्यक्षांची मान्यता घेणे आवश्यक असते. परंतु सदर प्रकरणात आवश्यक ती कार्यपद्धती पाळण्यात आलेली नसल्याचा आरोप आहे. त्यामुळे सादर केलेला प्रस्ताव हा नियमबाह्य व अमान्य ठरतो. भाजप चे विनोद रत्नपारखे शिफारस अनधिकृत असल्याचे जिल्हाध्यक्ष देशमुख यांनी म्हंटले आहे.
गटनेतेही आक्रमक
काँग्रेसमधील गटनेत्यांनीही जिल्हाध्यक्षांवर आरोप केले आहेत. स्वीकृत सदस्य निवडीपूर्वीच कॉंग्रेसमधील वाद चव्हाट्यावर आल्याने काँग्रेसमधील गटबाजीमुळे स्वीकृत सदस्य निवडीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.