

छत्रपती संभाजीनगर : महापालिका निवडणूक होऊन दोन महिने उलटले असून, अद्यापही नऊ पराभूत उमेदवारांनी खर्चाचा तपशील सादर केलेला नाही. त्यामुळे या 9 जणांना खर्च सादर करण्याबद्दल नोटीस बजावण्यात आल्या आहेत. 15 दिवसांत खर्च सादर करावा, असे नोटीसद्वारे कळविण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
नुकत्याच महापालिका निवडणुका पार पडल्या असून, शहराच्या 29 प्रभागांतून 115 जागांसाठी 858 उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले होते. या उमेदवारांना निवडणुकीत खर्चाची मर्यादा 11 लाख रुपयांपर्यंत होती. दैनंदिन खर्च सादर करणे बंधनकारक असतानाही अनेक उमेदवारांनी निवडणुकीनंतरच खर्च सादर केला.
महापालिकेने खर्च सादर करण्यासाठी सुरुवातीला महिनाभराचा कालावधी दिला होता. या कालावधीत 842 उमेदवारांनी निवडणूक निर्वाचन अधिकारी तथा झोन कार्यालयात निवडणूक खर्चाचा तपशील सादर केला. उमेदवारांनी सादर केलेला खर्च हा 11 लाख रुपयांच्या मर्यादेत आहे.
त्यानंतर उर्वरित उमेदवारांना सात दिवसांत खर्च सादर करण्याचे पत्राद्वारे कळविण्यात आले होते. त्यापैकी 7 उमेदवारांनी खर्च सादर केला. उर्वरित 9 उमेदवारांनी अद्यापही खर्च सादर केलेला नाही.
या झोनमधील उमेदवारांना नोटीस
झोन-4 मधील 4 उमेदवार, झोन-1 मधील एक उमेदवार, झोन-2 मधील 2, तर झोन-6 मधील 2 अशा 9 उमेदवारांचा समावेश आहे. या पराभूत झालेल्या उमेदवारांना नोटीस बजावण्यात आल्या असून, 15 दिवसांत निवडणुकीचा खर्च सादर करा, असे कळविण्यात आले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.