

जालना : कलश सीड्स फाउंडेशनतर्फे जालना एज्युकेशन फाउंडेशनच्या माध्यमातून सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षाकरिता आर्थिक दुर्बल घटकातील गरजू व होतकरू विद्यार्थ्यांसाठी एकूण १८ व्यावसायिक कोर्सेससाठी राबविण्यात येत असलेल्या कलश सीड्स शिष्यवृत्ती योजनेसाठी ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी येत्या ५ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
१५ सप्टेंबर ही अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख होती. मात्र, बहुतांश कोर्सची प्रवेश प्रक्रिया अद्याप पूर्ण न झाल्याने कुणीही विद्यार्थी योजनेपासून वंचित राहू नये म्हणून अर्ज सादर करण्यासाठी ५ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
फक्त अभ्यासक्रमाच्या या वर्षी प्रथम वर्षात प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांना या योजनेत सहभागी होता येणार आहे. दहावी किंवा बारावीची परीक्षा जालना जिल्ह्यातून उत्तीर्ण केलेले आणि कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न तीन लाख रुपयांच्या आत असलेल्या विद्यार्थ्यांनी या योजनेचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा आणि अधिक माहितीसाठी जालना शहरातील व्यंकटेशनगरमधील जालना एज्युकेशन फाउंडेशनच्या कार्यालयात योजनेचे प्रकल्प समन्वयक रुक्मिणीकांत दीक्षित व दिलीप केंद्रे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन कलश सीड्सचे चेअरमन सुरेश अग्रवाल, व्यवस्थापकीय संचालक समीर अग्रवाल, संचालिका सौ. वर्षा अग्रवाल, जालना एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रा. सुरेश लाहोटी, अध्यक्ष सुनील रायठठ्ठा, सचिव सुरेश कुलकर्णी यांनी केले आहे.
या कोर्सेससाठी मिळणार शिष्यवृत्ती
एमबीबीएस, इंजीनियरिंग, एम.टेक. आयसीटी जालना, सीए, सीएस, आयसीडब्ल्यूए फाउंडेशन, सीए, सीएस, आयसीडब्ल्यूए प्रथम आणि द्वितीय वर्ष, एलएलबी (पाच वर्षाचा एकत्रित अभ्यासक्रम), बी.फार्मसी, बी.एस्सी. एग्रीकल्चर, बी.एस्सी. नर्सिंग, पॉलिटेक्निक आणि आयटीआय आदी १८ कोर्सेससाठी ही शिष्यवृत्ती योजना लागू आहे.