

छत्रपती संभाजीनगर : मुकुंदवाडी परिसरातील गुंड कुख्यात धीरज रवींद्र केदारे (२६, रा. संजयनगर गल्ली नं. १२, मुकुंदवाडी) एमपीडीए अंतर्गत स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली आहे. पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी त्याच्या वाढत्या गुन्हेगारीची गंभीर दखल घेत हे आदेश जारी केले असून, आरोपीची रवानगी थेट कोल्हापूर मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे.
धीरज केदारे याच्यावर एमआयडीसी सिडको आणि मुकुंदवाडी ठाण्यात अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. यात घातक हत्यारांनी जबर दुखापत करणे, जबरी चोरी, महिलेचा विनयभंग करण्याच्या उद्देशाने हल्ला करणे, हद्दपार आदेशाचे व प्रतिबंधक आदेशाचे उल्लंघन करणे, गुन्ह्याचा पुरावा नष्ट करणे, आणि दहशत माजवणे अशा गंभीर गुन्ह्यांचा समावेश आहे.
केदारे याची गुन्हेगारी रोखण्यासाठी यापूर्वी त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती. तसेच हद्दपारही केले होते. मात्र, या कारवायांना न जुमानता त्याने गुन्हे करणे सुरूच ठेवले. त्यामुळे कारवाईचा बडगा उगारण्यात आला. सोमवारी (दि. १४) त्याला हा आदेश तामील करून कोल्हापूर कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले.
ही कारवाई पोलिस आयुक्त प्रविण पवार, उपायुक्त (गुन्हे) शशिकांत सातव, पोलिस उपायुक्त (परिमंडळ-२) रत्नाकर नवले, सहायक आयुक्त मनिष कल्याणकर आणि मजहर सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजानन कल्याणकर, मुकुंदवाडीचे पोलिस निरीक्षक विवेक सोनवणे, सहायक निरीक्षक रोहीत गांगुर्डे, उपनिरीक्षक अजय शितोळे, सुखदेव जाधव, अंमलदार समाधान काळे, दिपाली सोनवणे, महादेव दाणे यांच्या पथकाने केली.