

जालना : जालना शहर कामगारांच्या संख्येचे निकष पूर्ण करत आहे. रुग्णालयासाठी आवश्यक असणारी जवळपास 10 एक्कर जमीन जालना महापालिका आणि औद्योगिक वसाहतीमध्ये उपलब्ध आहे. आवश्यक बाबींचा अंतर्भाव असणारा प्रस्ताव देखील तयार आहे. त्यामुळे जालना शहरात राज्य कामगार विमा योजना (ईएसआयसी) 100 खाटांचे रुग्णालय मंजूर करावे, अशी मागणी माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी केली.
या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन सादर केले. जालना शहर औद्योगिक क्षेत्रात राज्यात अग्रेसर असून जालना स्टील क्लस्टरमुळे या शहराची ओळख संपूर्ण भारतात आहे. येथील कामगाराच्या आरोग्य आणि सुरक्षिततेसाठी जालना येथे स्वतंत्र ईएसआयसी रुग्णालय सुरू करण्याची आवश्यकता आहे.
जालना स्टील क्लस्टरमध्ये अनेक रोलिंग मिल्स आणि फर्नेस युनिटस् कार्यरत आहेत. ही बाब माजी आमदार तथा भाजप नेते कैलास गोरंट्याल यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निदर्शनास आणून दिली.
याबाबत सकारात्मक विचार करून लवकरच निर्णय घेण्याची ग्वाही दिल्याचे गोरंटयाल यांनी सांगितले.
70 हजार कामगार
जालना आणि लगतच्या औद्योगिक क्षेत्रात, बिडी कामगार व इतर नोंदणीकृत अंदाजे 60 ते 70 हजार कामगार आहेत. कामगार व त्यांचे कुटुंबीय मिळून अंदाजे 2 लाख 5 हजार नागरिक या योजनेवर अवलंबून आहेत. ईएसआयसीच्या निकषात जालना जिल्हा बसत असल्याचे त्यांनी सांगितले.