Devendra Fadnavis : उड्डाणपुलाचा विषय 15 दिवसांत मार्गी लावणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; केंद्र सरकारकडून एनओसी मंजूर करून देणार
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis
Published on
Updated on

दीपक शेळके

सोलापूर : शहरातील प्रलंबित उड्डाणपुलांच्या कामाला अखेर गती मिळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. अनेक वर्षांपासून केंद्र व राज्य शासनाच्या विविध विभागांकडून भूसंपादन आणि एनओसीच्या अडचणीमुळे रखडलेला हा महत्त्वाचा प्रकल्प आता मार्गी लागण्याच्या दिशेने निर्णायक टप्प्यात पोहोचला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः पुढाकार घेत या अडथळ्यांवर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले आहे.

ह.दे. प्रशालेच्या मैदानावर विजयी संकल्प मेळाव्यात मुख्यमंत्र्यांनी हे आश्वासन दिले. सोलापूर महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत विजयी झालेल्या लोकप्रतिनिधींचा सत्कार मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर पालकमंत्री जयकुमार गोरे, आ. विजयकुमार देशमुख, सुभाष देशमुख, देवेंद्र कोठे, समाधान आवताडे, माजी खासदार डॉ. जय सिद्धेश्वर महास्वामी, माजी आमदार दिलीप माने, राजन पाटील, रामभाऊ सातपुते, महापौर विनायक कोंड्याल, उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, सभागृहनेते नरेंद्र काळे, शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर, जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण, जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य, उपाध्यक्ष इंद्रजीत पवार, गटनेत्या रश्मी बागल, सभापती रामप्पा चिवडशेट्टी, चेतनसिंह केदार, संस्कृती सातपुते, अमृता वाघे उपस्थित होते.

सोलापूर शहराच्या दळणवळण व्यवस्थेसाठी अत्यावश्यक असलेले दोन उड्डाणपूल प्रकल्प गेल्या आठ वर्षांपासून केवळ कागदोपत्रीच राहिले होते. विशेषतः रेल्वे, संरक्षण, तसेच इतर केंद्रीय विभागांकडून जागा ताब्यात देण्यास विलंब होत असल्याने कामाला सुरुवातच होत नव्हती. यामुळे शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न अधिकच गंभीर बनला होता. मुख्यमंत्री फडणवीस यांनी संबंधित सर्व विभागांची संयुक्त बैठक येत्या 15 दिवसांत बोलावण्याचे निर्देश दिले आहेत. या बैठकीत प्रलंबित एनओसी तातडीने मंजूर करून भूसंपादन प्रक्रिया पूर्ण करण्यावर भर दिला जाणार आहे. त्यामुळे उड्डाणपुलांच्या कामासाठी असलेले प्रशासकीय अडथळे दूर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सोलापुरातील आपल्या 35 मिनटांच्या भाषणात सोलापूरच्या अनेक विषयावर भाष्य केले.

सोलापूरच्या आयटी पार्कविषयी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, आयटी पार्क ही काही फक्त घोषण नाही. फेब्रुवारीत जागा हस्तांतरित केली. आता आयटी पार्क तयार करून शिकेल त्यास सोलापुरातच काम देणार आहोत. शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय देखील याच वर्षी सुरू करण्याचा आमचा प्रयत्न आहे.

सोलापूरच्या पिण्याच्या पाण्याच्या महत्त्वाकांक्षी योजनेविषयी मुख्यमंत्री म्हणाले, पिण्याच्या पाण्याची चांगली योजना आम्ही आणली. 1400 कोटी योजनेच्या माध्यमातून साठवण क्षमता वाढणार आहे. पुढील पाच वर्षात प्रत्येक घराघरात आम्ही पाणी पोहोचविणार आहोत. या योजनेसाठी निधीची कमतरता पडणार नाही. तुम्ही मागेल तितका पैसा मिळेल. परंतु पाच वर्षांनी आपण जेव्हा मते मागायला घरोघरी जाऊ तेव्हा मुबलक पाणी पोहोचलेले पाहायला मिळेल. 13 चाळी, 22 सोसायट्या फ्री होल्ड करण्याचा निर्णय आम्ही करत आहोत. सोलापुरात एअरपोर्ट सुरू केले आहे. आता नाईट लँडिंगचे काम करायचे आहे. विमान कंपनीचे ऑपरेटर मुंबईत जो स्लॉट मागतील तो देईन. त्यानंतर दिवसाची, सोईस्कर मुंबई विमानसेवा सुरू करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.

प्रारंभी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले. यानंतर संयोजकांच्या वतीने मुख्यमंत्री फडणवीस, पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा गौरव करण्यात आला. शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांनी पक्षाला निवडणुकीत मिळालेली यशोगाथा प्रास्ताविकात सांगितली. सूत्रसंचालन श्वेता हुल्ले केले. आभार जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण यांनी मानले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news