

Jalna Dog news
तळणी - मंठा तालुक्यातील तळणी गावात गेल्या दोन दिवसांपासून पिसाळलेल्या कुत्र्याने अक्षरशः थैमान घातले असून आतापर्यंत १० ते १२ जणांना चावा घेऊन जखमी केले आहे. या घटनेमुळे गावभर भीतीचे वातावरण पसरले आहे.
गावभर धाव घेत कुत्र्याने महिला, मुले व ज्येष्ठ नागरिकांवर हल्ला चढवला. यामध्ये पार्वती नामदेव मस्के (५०), मीना राहुल सदावर्ते (३२), ईश्वरी अंगद घोरपडे (७), प्रयागबाई सुरेश गायकवाड (४८), मंदाबाई नायबराव डोंगरे (३७), विष्णू गुजर (५२), किशोर सावसके (४५), कार्तिक ज्ञानेश्वर आढळकर (५), शिवानी गोपाल दुगाणे (२५) पुष्पाबाई बबन चौकस्कर बय७५ व विष्णू वाघमोडे (६०) वेबाबाई गते आदी जखमी झाले आहेत. यातील काहींना तातडीने जालना येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
सततच्या हल्ल्यांमुळे गावकरी घराबाहेर पडण्यास धजावत नाहीत. दरम्यान, ग्रामस्थांनी प्रशासनाकडे तातडीने पिसाळलेल्या कुत्र्याचा बंदोबस्त करून गावाला या धोक्यातून मुक्त करण्याची मागणी केली आहे. तसेच तळणी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात यापुढील लस उपलब्ध करून देण्यात यावी, अशी मागणी तळणी येथील ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे.
गावकऱ्यांनी सदरील कुत्र्यापासून सावधगिरी बाळगावी. कुत्रा दिसल्यास त्वरित कॉल करा आणि प्रशासनाला माहिती द्या. गावकऱ्यांनी खबरदारी घ्यावी, सुरक्षित राहावे.
-गौतम सदावर्ते, सरपंच तळणी