

जालना : जालना जिल्ह्यात घटस्फोटित, परित्यक्ता, विधवा व अविवाहित अशा एकूण 69,358 एकल महिला आहेत. यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सर्वकष प्रयत्न होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी केले.
गुरुवार दि. 29 रोजी महिला व बालविकास विभागांतर्गत राबविण्यात येणाऱ्या ‘मिशन वात्सल्य व मिशन शक्ती’ अंतर्गत संनियंत्रण समितीची त्रैमासिक बैठक जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी त्या बोलत होत्या.
या बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जालना पी. एम. मिन्नू, निवासी उपजिल्हाधिकारी शशिकांत हदगल, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कोमल कोरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. जयश्री भुसारे,पोलिस उप अधीक्षक निकाळजे, व्यवस्थापक जिल्हा अग्रणी बँक मंगेश केदार, जिल्हा कौशल्य विकास अधिकारी गणेश चिमणकर, युनिसेफच्या सदस्य अल्पा वोरा यांच्यासह संबंधित विभागातील अधिकारी यांची उपस्थिती होती.
या बैठकीत एकल महिलांच्या पुनर्वसनासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची सद्यस्थिती, लाभार्थ्यांना मिळणाऱ्या सुविधा, तसेच त्यांना आर्थिक, सामाजिक व मानसिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
मिशन शक्ती अंतर्गत महिलांच्या सुरक्षितता, सक्षमीकरण, स्वावलंबन व रोजगारनिर्मितीच्या उपक्रमांचा आढावा घेण्यात आला. महिलांवरील हिंसाचार प्रतिबंध, तक्रार निवारण यंत्रणा बळकट करणे, तसेच विविध विभागांनी एकत्रितपणे काम करण्यावर भर देण्याचे निर्देश देण्यात आले. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजनेचा लाभ प्रभावीपणे सर्व पात्र लाभार्थांना देण्यात यावा, अशा सूचना देण्यात आल्या. तालुकानिहाय एकल महिलांसाठी मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे.
एकल महिला येतील प्रवाहात
शासकीय कागदपत्रे उपलब्ध करून दिले जाणार आहेत. तसेच एकल महिलांसाठी आरोग्य, पोषण व त्यांच्यासाठी शासन स्तरावरून ज्या काही योजना राबविल्या जातात, त्यांची माहिती व लाभ पोहचविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. या महिलांचा समावेश महिला बचत गटात करणे, बालसंगोपन योजनेचा लाभ मिळवून देणे, रोजगार विषयक कार्यशाळा आयोजित करणे.