

गंगापूर : पहाटेच्या अंधारात काळाने झडप घातल्याची हृदयद्रावक घटना गंगापूर तालुक्यात घडली. भरधाव ट्रकने उसाच्या बैलगाडीला मागून जोरदार धडक दिल्याने राजू उत्तम ठेंपे (रा. खामखेडा, ता. फुलंबी) या ऊसतोड मजुराचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांचा अल्पवयीन मुलगा सोपान ठेंपे थोडक्यात बचावला.
राजू ठेंपे हे आपल्या कुटुंबासह मुक्तेश्वर साखर कारखान्यात ऊसतोड मजुरी करत होते. नेहमीप्रमाणे बुधवारी (दि.28) पहाटे 3 वाजता ते मुलासोबत शेंदुरवादा शिवारात ऊस तोडीसाठी बैलगाडीने जात होते. यावेळी इसारवाडीहून बिडकीनकडे जाणाऱ्या भरधाव ट्रकने त्यांच्या बैलगाडीला मागून जारात धडक दिली.
या भीषण अपघातात राजू ठेंपे यांचा जागीच मृत्यू झाला, तर मुलगा सोपान बैलगाडीतून उडून थेट रस्त्याच्या कडेला फेकल्या गेला. क्षणात सर्व काही संपले. वडिलांचा मृत्यू डोळ्यासमोर पाहण्याची दुर्दैवी वेळ त्या मुलावर आली. घटनास्थळी उपस्थितांचे डोळे पाणावले. जखमी सोपान ठेंपे याला तातडीने रुग्णवाहिकेतून गंगापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
ट्रक चालकाला पकडले
अपघातानंतर मदत करण्याऐवजी ट्रक चालक श्रीकेश गिऱ्हे (रा.उदगीर) याने ट्रक सुसाट वेगाने बिडकीनच्या दिशेने पळ काढला, मात्र मागून येणाऱ्या सजग वाहनचालकांनी हा प्रसंग पाहून शेंदुरवादा परिसरात ट्रक आडवा लावून चालकाला पकडल्यामुळे मोठा अनर्थ टळला.