

अमरावती : ग्रामीण पोलिसांनी अवैध अंमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई करत गुटखा तस्करीच्या रॅकेटला जबर धक्का दिला आहे. पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे चांदूर रेल्वे पोलिसांनी सापळा रचून सुमारे १ कोटी १ लाख ३५ हजार रुपयांचा १० टन गुटखा, तंबाखू आणि ट्रक जप्त केला. एवढ्या मोठ्या प्रमाणात अमरावतीत येणारा गुटखा नेमका कुणाचा होता. याचा पोलिसांकडून तपास सुरू असून या कारवाईमुळे गुटखा व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे.
पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई १२ मे रोजी करण्यात आली. माहिती मिळताच चांदूर रेल्वे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजय आकरे यांनी पथकासह तातडीने पाठलाग करून मालखेड मार्ग परिसरात एमएच ०१/सीव्ही ४९६२ क्रमांकाचा ट्रक घेराव घालून पकडला. सुरुवातीला चालकाची चौकशी करण्यात आली. त्यानंतर ट्रकची झडती घेतली असता त्यामध्ये प्रतिबंधित गुटखा व तंबाखूचा सुमारे १० टन साठा आढळून आला. या मालाची किंमत ७५ लाख ७५ हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. याशिवाय २५ लाख रुपयांचा ट्रक, दोन मोबाईल असा एकूण १ कोटी १ लाख ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या कारवाईदरम्यान पोलिसांनी ट्रक चालक शेख इमरान शेख मुस्कान (वय ३६, पठाण चौक, अमरावती) याला ताब्यात घेतले. प्राथमिक चौकशीत या रॅकेटमध्ये आणखी तीन ते चार आरोपींचा सहभाग असल्याची माहिती समोर आली असून ते सध्या फरार आहेत. सर्व आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून फरार आरोपींच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत. पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही गुटख्याची खेप अमरावतीकडे येत होती. मात्र हा गुटखा नेमका कुठून आणला गेला आणि तो कुणासाठी होता, याबाबतची माहिती अद्याप समोर आलेली नाही. चांदूर रेल्वे पोलीस चालक शेख इमरान याची कसून चौकशी करीत आहेत.
पोलीस अधीक्षकांच्या आदेशानंतर झालेल्या या कारवाईमुळे शहर व जिल्ह्यातील गुटखा माफियांची नावे समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पुढील तपास चांदूर रेल्वे पोलीस करीत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक निकेतन कदम, अपर पोलीस अधीक्षक दत्ता तोटेवाड, चांदूर रेल्वे उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल पवार आणि पोलीस निरीक्षक अजय आकरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पीएसआय वीणा पांडे, रोहित कुदळे, नीतेश आझाडे यांच्यासह पोलीस कर्मचारी शिवाजी, शेख, नितीन, योगेश, राहुल, कीर्ती, संदीप, सागर, ऋषिकेश, शुभम, स्वप्नील, निलेश आणि रामेश्वर यांनी कारवाईत सहभाग घेतला.