

जालना : शहरातील सदर बाजार पोलिसांनी जिजामाता चौक परिसरात मंगळवार, 1 जुलै रोजी कारवाई करीत गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या एका तरुणास जेरबंद केले. या तरुणाचे नाव अविनाश अंकुश वाघमारे ( 24) असे असून तो जुना जालना परिसरातील माळीपुरा येथील रहिवासी आहे.
दरम्यान, अविनाश वाघमारे याची पोलिसांनी चौकशी केली असता त्याने हा गावठी पिस्तूल शेख शकील शेख शाहेद याच्या मध्यस्थीने जय कन्हैया भांडारकर याच्याकडून खरेदी केल्याची कबुली दिली आहे. यातील गावठी पिस्तूल विकणारा आरोपी जय भांडारकर हा पोलीस मुख्यालयात कार्यरत असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्यांचा मुलगा असल्याचे समजते. याप्रकरणी आरोपी अविनाश वाघमारे, शेख शकील आणि जय भांडारकर या तीन जणांविरुद्ध भारतीय हत्यार बंदी कायदा 4/25 आणि मुंबई पोलीस कायद्याच्या 135 कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कामगिरी सदर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप भारती, पोलीस उपनिरीक्षक शैलेश म्हस्के, पोहेकाँ. रामप्रसाद रंगे, नजीर पटेल,दुर्गेश गोफणे, अजीम शेख, गणेश तेजनकर, भगवान मुंजाळ, राहुल कटकम, धनंजय लोंढे यांच्यासह दामिनी पथकाचे कर्मचारी यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली केली आहे.