

Jalna Crime News: Aniket Jadhav, absconding accused in Mokka crime, arrested
जालना, पुढारी वृत्तसेवा : दरोडा आणि महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण (मोक्का) कायद्यान्वये दाखल असलेल्या गंभीर गुन्ह्यातील तब्बल नऊ महिन्यांपासून फरार असलेल्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. अनिकेत संतोष जाधव (रा. गुंडप्पा गल्ली, डबल जिन, जालना) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १६ ऑक्टोबर २०२५ रोजी मध्यरात्री शासकीय कंत्राटदार शैलेश देविदास यांच्या श्रीकृष्णनगर येथील घरावर सशस्त्र दरोडा टाकण्यात आला होता. या प्रकरणी चंदनझिरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तपासा दरम्यान आरोपींवर मोक्का कायद्यातील विविध कलमे वाढविण्यात आली होती. या गंभीर गुन्ह्याचा तपास उपविभागीय पोलिस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्याकडे सोपविण्यात आला होता.
या गुन्ह्यातील इतर आरोपींना यापूर्वी अटक करण्यात आली होती. मात्र अनिकेत जाधव हा सातत्याने आपले ठिकाण बदलत पोलिसांना गुंगारा देत फरार होता. त्यामुळे त्याचा शोध घेऊन अटक करण्याच्या सूचना पोलिस अधीक्षक तेगबीर सिंह संधू यांनी स्थानिक गुन्हे शाखेला दिल्या होत्या.
पोलिस निरीक्षक पंकज जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे आरोपीचा शोध सुरू ठेवला. अखेर १८ जुलै २०२६ रोजी आरोपी गांधी चमन परिसरात आल्याची माहिती मिळाल्यानंतर पथकाने तत्काळ सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. त्यानंतर पुढील कारवाईसाठी आरोपीला तपास अधिकाऱ्यांच्या स्वाधीन करण्यात आले.
यांनी केली कारवाई
ही कारवाई पोलिस अधीक्षक तेजस्वी सिंह संधू, अपर पोलिस अधीक्षक विक्रम साळी आणि उपविभागीय पोलिस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक पंकज जाधव, सपोनि. सचिन खामगळ, पोउपनि. राजेंद्र वाघ तसेच स्थानिक गुन्हे शाखेतील अंमलदार गोपाळ गोसिक, रमेश राठोड, प्रभाकर वाघ, विजय डिक्कर, इरशाद पटेल, सागर बाविस्कर, दत्ता वाघुंडे, शिवप्रसाद एकुंडे, रमेश काळे, कैलास चेके, योगेश म्हसाणे आणि धीरज भोसले यांनी केली.