

Jalna News: Three arrested in connection with the Rajureshwar Ginning theft case
जालना, पुढारी वृत्तसेवा : भोकरदन तालुक्यातील राजुरेश्वर जिनिंगमधील शटर उचकवून चोरी करणाऱ्या तीन आरोपींसह चोरीचा माल खरेदी करणाऱ्या दोन भंगार विक्रेत्यांना स्थानिक गुन्हे शाखा व हसनाबाद पोलिसांनी संयुक्त कारवाईत अटक केली आहे. या कारवाईत गुन्ह्यात वापरलेले वाहन व मोबाईलसह साडेचार लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
फिर्यादी अशेष गिरधारीलाल जैन (वय ३३), व्यवस्थापक, राजुरेश्वर जिनिंग यांनी दिलेल्या तक्रारीनुसार ३ जुलैच्या रात्री ते ४ जुलैच्या पहाटेदरम्यान राजुरेश्वर जिनिंगच्या स्टोअररूममधून ७५ लोखंडी गेट अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले होते.
याप्रकरणी हसनाबाद पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १९७/२०२६ अन्वये चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास करताना स्थानिक गुन्हे शाखेने तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे आरोपींचा शोध घेतला. पोलिसांनी श्याम विष्णू सन्यासी (३५), लहू घोंडीराम पवार (४०) आणि सय्यद अफरोज सय्यद हसन (३५), सर्व रा. जालना यांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी चोरीची कबुली देत चोरीचा माल अन्वर खान गफूर खान व शेख नासेर शेख लतीफ या भंगार व्यावसायिकांना विकल्याची माहिती दिली.
त्यानंतर दोन्ही भंगार विक्रेत्यांनाही पोलिसांनी अटक केली. ही कारवाई पोलीस अधीक्षक तेगबीर सिंह संधू, अपर पोलीस अधीक्षक विक्रम साळी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव, हसनाबाद पोलीस ठाण्याचे प्रभारी सपोनि योगेश जावळे तसेच स्थानिक गुन्हे शाखा व हसनाबाद पोलीस ठाण्याच्या पथकाने संयुक्तरीत्या केली.
बोलेरो जप्त
कारवाई दरम्यान गुन्ह्यात वापरण्यात आलेले महेंद्रा बोलेरो पिकअप (एमएच-४८ सीबी-३०८५) आणि आरोपींकडील चार मोबाईल फोन असा ४ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.