

जालना : सुहास कुलकर्णी
जालना जिल्ह्यात काँग्रेस पक्षाची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. खंबीर नेतृत्वाचा अभाव, अंतर्गत गटबाजी आणि संघटनात्मक कमकुवतपणा यामुळे पक्षाची ताकद कमी होत चालल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. एकेकाळी जिल्ह्याच्या राजकारणावर प्रभाव असलेल्या काँग्रेसची आजची परिस्थिती मात्र दिशाहीन झाल्याचे मानले जात आहे.
जिल्ह्यातील अनेक कार्यकर्ते आणि स्थानिक नेते इतर पक्षांकडे वळताना दिसत आहेत. लोकसभा निवडणुकीत भाजपचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे यांच्या विरोधातील वातावरणाचा फायदा घेत काँग्रेसचे डॉ. कल्याण काळे हे विजयी झाले होते. त्यामुळे काँग्रेसला नवसंजीवनी मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र त्यानंतर झालेल्या महापालिका निवडणुकीत काँग्रेसला केवळ नऊ जागांवर समाधान मानावे लागले.
महापालिकेतील स्वीकृत सदस्य निवडणुकीदरम्यान पक्षातील अंतर्गत मतभेद उघडपणे समोर आले. जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख आणि काँग्रेस गटनेतृत्वातील वाद चव्हाट्यावर आला. त्यानंतर पक्षश्रेष्ठींनी काही पदाधिकाऱ्यांवर कारवाई करत सदस्यांना पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवला. त्यामुळे आधीच कमकुवत झालेल्या संघटनेला आणखी धक्का बसल्याचे मानले जात आहे.
आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप, शिवसेना शिंदे गट आणि इतर पक्षांनी बैठका, मेळावे आणि संघटनात्मक हालचाली सुरू केल्या आहेत. मात्र काँग्रेसमध्ये निवडणुकीचे वातावरण अद्याप निर्माण झालेले दिसत नाही. माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी पक्ष सोडल्यानंतर संघटनात्मक बांधणी अधिकच कमकुवत झाल्याचे चित्र आहे.
काँग्रेसच्या बैठकींमध्ये व्यासपीठावर नेत्यांची संख्या जास्त आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती कमी दिसत असल्याची चर्चा आहे. पारंपरिक मतदारवर्ग इतर पक्षांकडे वळल्याचे चित्र मागील निवडणुकांमधून स्पष्ट झाले आहे.