Chilli Crop Disease | मिरचीवर 'भुरी'चा प्रादुर्भाव; उत्पादन घटण्याच्या शक्यतेने शेतकरी चिंतेत

पानांच्या खालच्या बाजूस लालसर रंगाची बुरशी जमा होऊन पाने पिवळी किंवा लालसर पडून गळू लागली आहेत
Jalna Chilli Farming Loss
Chilli Farming LossPudhari
Published on
Updated on

Jalna Chilli Farming Loss

सादिक शेख

आन्वा : मागील पंधरवड्यापासून सुरू असलेल्या सततच्या ढगाळ वातावरणामुळे मिरची पिकावर ‘भुरी’ या बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. पानांच्या खालच्या बाजूस लालसर रंगाची बुरशी जमा होत असून पाने पिवळी किंवा लालसर पडून गळत असल्याचे शेतकऱ्यांच्या निदर्शनास येत आहे. रोगाचा प्रादुर्भाव वाढल्यास झाडे कोमेजून उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

मिरची पिकावर ‘लाल्या’ किंवा पिवळेपणा आणणारा भुरी हा बुरशीजन्य रोग तसेच चुरडा-मुरडा हा विषाणूजन्य रोग आढळतो. सततचे ढगाळ वातावरण, वाढलेली आर्द्रता आणि रसशोषक किडींचा प्रादुर्भाव यामुळे या रोगांचा फैलाव वेगाने होतो. सध्या वातावरणात सातत्याने बदल होत असल्याने त्याचा थेट परिणाम मिरची पिकावर होत आहे.

Jalna Chilli Farming Loss
Jalna accident: अंढेरा फाट्यावर महसूल पथकाच्या वाहनाला टिप्परची धडक; तहसीलदारांसह चौघे बचावले

भोकरदन तालुक्यात यंदा जवळपास १० हजार हेक्टर क्षेत्रावर मिरचीची लागवड करण्यात आली आहे. मिरचीला चांगला दर मिळाल्याने मे महिन्यापासूनच लागवडीला मोठ्या प्रमाणात सुरुवात झाली होती. पावसाने साथ दिली नसतानाही शेतकऱ्यांनी विहिरी व कूपनलिकांच्या पाण्यावर कृषीपंपांच्या माध्यमातून मिरची रोपांची लागवड करून संगोपन सुरू ठेवले.

गेल्या तीन महिन्यांत मिरचीच्या रोपांची चांगली वाढ होऊन पाने बळकट होऊ लागल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला होता. मात्र, गेल्या १५ दिवसांपासून वेळोवेळी निर्माण होत असलेल्या ढगाळ वातावरणामुळे रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. पानांच्या खालच्या बाजूस बुरशी जमा होत असल्याने झाडांची वाढ खुंटण्याबरोबरच कोमेजणे आणि आकस्मिक मर रोगाचा धोका वाढला आहे.

Jalna Chilli Farming Loss
Jalna News : ट्रॅक्टर, रोटाव्हेटरवर मिळणार सव्वालाखांपर्यंत अनुदान; संगणकीय लॉटरीद्वारे होणार निवड

रोग नियंत्रणासाठी शेतकरी महागड्या फवारण्या करीत आहेत. मात्र, त्याचा अपेक्षित परिणाम होत नसल्याने उत्पादन खर्च वाढत असून आर्थिक नुकसान होण्याची भीती निर्माण झाली आहे. यंदा पावसाची स्थिती कमकुवत असल्याने शेतकऱ्यांनी पाण्याची उपलब्धता करून मिरची पिकाचे संगोपन केले आहे. त्यामुळे प्रतिकूल वातावरणामुळे पीक खराब झाल्यास शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे.

कृषी विभागाकडून मार्गदर्शनाची गरज

भुरी रोगाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता कृषी विभागाने शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन रोगाची पाहणी करून योग्य उपाययोजनांबाबत मार्गदर्शन करणे गरजेचे आहे. वेळेत प्रतिबंधात्मक उपाय न केल्यास मिरचीच्या उत्पादनावर त्याचा गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे.

Jalna Chilli Farming Loss
Jalna agriculture : ऊस पिकावर पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव

गेल्या पंधरवड्यापासून सततच्या ढगाळ वातावरणामुळे मिरचीवर भुरी रोगाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. पानांच्या खालच्या बाजूस लालसर बुरशी जमा होत आहे. झाडे कोमेजून आकस्मिक मर रोगाचा प्रादुर्भावही वाढत आहे. हजारो रुपये खर्च करून फवारण्या केल्या, तरी अपेक्षित फायदा होत नसल्याने चिंता वाढली आहे.

— सुनिल जाधव, शेतकरी, कुकडी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news