

देऊळगाव राजा : अवैध रेती वाहतुकीविरोधात कारवाईसाठी गेलेल्या महसूल विभागाच्या पथकाच्या वाहनाला रेतीने भरलेल्या टिप्परने धडक दिल्याची धक्कादायक घटना बुधवारी (१९ ऑगस्ट) सकाळी अंढेरा फाट्याजवळ घडली. या घटनेत तहसीलदार वैशाली डोंगरजाळ यांच्यासह पथकातील चार जण थोडक्यात बचावले. धडकेनंतर टिप्पर चालकाने घटनास्थळावरून वाहनासह पळ काढला; मात्र महसूल पथकाने त्याचा सुमारे ५०० मीटरपर्यंत पाठलाग करून टिप्पर ताब्यात घेतला.
अंढेरा व चिखली परिसरात अवैध रेती वाहतुकीबाबत प्रशासनाकडे सातत्याने तक्रारी प्राप्त होत होत्या. या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर तहसीलदार वैशाली डोंगरजाळ यांच्या नेतृत्वाखाली महसूल विभागाचे पथक पहाटेच कारवाईसाठी रवाना झाले होते. सकाळी पावणेसातच्या सुमारास अंढेरा फाट्याजवळ रेतीने भरलेला पांढऱ्या रंगाचा टिप्पर पथकाच्या निदर्शनास आला.
पथकाने टिप्पर थांबवून चालकाची चौकशी सुरू केली. त्याला पुढील कारवाईसाठी पोलिस ठाण्यात घेऊन जाण्याची सूचना करण्यात आली. मात्र, चालकाने त्यास विरोध करत वाहन घेऊन निघून जाण्याचा प्रयत्न केला. याचदरम्यान टिप्पर मालक हर्षल अंभोरे याने चालकाला पथकाचे वाहन हटविण्याच्या उद्देशाने वाहन पुढे नेण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. त्यानंतर टिप्पर चालकाने तहसीलदारांच्या पथकाची एमएच-४६-डी-५५ क्रमांकाची इनोव्हा कार लक्ष्य करत तीव्र वेगाने टिप्पर वळवला. टिप्परची इनोव्हा कारला धडक बसली. या घटनेत तहसीलदार वैशाली डोंगरजाळ, तलाठी आकाश खरात, पंजाब ताठे तसेच वाहनचालक संतोष भोपळे हे बचावले.
धडक दिल्यानंतर टिप्पर चालकाने वाहन घेऊन तेथून पळ काढला. महसूल पथकाने त्याचा पाठलाग करत सुमारे ५०० मीटर अंतरावर टिप्पर अडवून चालकाला ताब्यात घेतले. या कारवाईत टिप्परसह चार ब्रास रेती आणि लाल रंगाची ब्रिझा कारही ताब्यात घेण्यात आल्याची माहिती आहे. या प्रकरणी टिप्पर मालक हर्षल अंभोरे आणि चालकाविरुद्ध भारतीय न्याय संहितेतील विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पथकाच्या तक्रारीनुसार बीएनएस कलम १०९(१), १३२, ३०३(२), १२६(२), ४५, ३(५), ४८(७) व ४८(८) अन्वये कारवाई करण्यात आली आहे.
तहसीलदारांचा गौरव अन् काही दिवसांतच धक्कादायक प्रकार
विशेष म्हणजे, तहसीलदार वैशाली डोंगरजाळ यांच्या महसूल विभागातील कामगिरीची दखल घेत स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमात बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंद आबा पाटील यांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला होता. या गौरवानंतर अवघ्या काही दिवसांतच अवैध रेती वाहतुकीवर कारवाई करताना त्यांच्या पथकाला अशा धोकादायक प्रसंगाला सामोरे जावे लागल्याने प्रशासनातील कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
कारवाई टाळण्यासाठी दबाव आणण्याचा आरोप
अवैध रेती वाहतुकीच्या कारवाईत अडथळे निर्माण करण्यासाठी काही वाहनांवर राजकीय किंवा प्रभावशाली व्यक्तींच्या नावांचा वापर केला जात असल्याची चर्चा आहे. प्रशासनाच्या कारवाईपासून बचाव करण्यासाठी अशा नावांचा आधार घेत दबाव निर्माण करण्याचे प्रकार होत असल्याचा आरोपही करण्यात येत आहे. त्यामुळे रेती तस्करीविरोधातील कारवाई अधिक कठोर करण्यासोबतच महसूल पथकांना आवश्यक सुरक्षा देण्याची गरज निर्माण झाली आहे.