

Pest infestation on the chickpea crop
पारध, पुढारी वृत्तसेवाः भोकरदन तालुक्यातील पारध परिसरात तीन चार दिवसापासुन ढगाळ वातावरण निर्माण झाल्यामुळे हरभरा पिकावर किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसुन येत आहे. सध्या हरभरा पीक फुलोऱ्याच्या अवस्थेत असताना ढगाळ हवामानामुळे फुलगळती होण्याची दाट शक्यता आहे.
काळात हरभरा हे रब्बी हंगामातील नगदी पीक असून अनेक शेतकऱ्यांच्या कुटुंबाचा आधार आहे. ऐन फुलोऱ्याच्या सूर्यप्रकाशाअभावी व हवेत वाढलेल्या आर्द्रतेमुळे फुलांची गळती होत असल्याचे चित्र शेतांमध्ये पाहायला मिळत आहे.
किडीच्या प्रादुर्भावामुळे हरभरा पिकास घाटे धरण्यावर मोठा परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. यंदा खत, बियाणे, मजुरी व औषधांच्या वाढलेल्या दरामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडलेला असतानाच आता निसर्गाच्या लहरीपणामुळे पुन्हा एकदा उत्पादन घटण्याची टांगती तलवार शेतकऱ्यांसमोर उभी राहिली आहे. रात्रंदिवस मेहनत करून उभे केलेलं पीक डोळ्यांसमोर संकटात सापडलेले पाहणं वेदनादायक असल्याची भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली.
कृषी तज्ज्ञांच्या मते, असे ढगाळ वातावरण दीर्घकाळ राहिल्यास कीड व बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याचीही शक्यता आहे.
त्यामुळे शेतकऱ्यांनी योग्य सल्ल्यानुसार प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, असे आवाहन करण्यात येत आहे. दरम्यान, हवामान लवकर सुधारावे आणि हरभरा पिकाला दिलासा मिळावा, अशीच प्रार्थना सध्या शेतकरी बांधव करताना दिसत आहेत.
शासनानेही हरभरा पिकावरील रोगाबाबत दखल घेऊन आवश्यक त्या मदतीसाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी शेतकऱ्यातुन करण्यत येत आहे.