

Bhokardan Car Falls Into Well
पारध : दुचाकीस्वाराला वाचविण्याच्या प्रयत्नात रस्त्यालगतच्या खोल विहिरीत कोसळलेली क्रेटा कार तब्बल १२ ते १३ तासांच्या अथक प्रयत्नांनंतर अखेर बाहेर काढण्यात आली. विहिरीतील पाण्याची खोली आणि रात्रीचा अंधार यामुळे बचावकार्य अत्यंत आव्हानात्मक ठरले. अखेर स्कुबा डायव्हर्सच्या मदतीने कार बाहेर काढण्यात यश आले. भोकरदन तालुक्यातील पारध–पद्मावती मार्गावर शुक्रवारी रात्री ही दुर्घटना घडली.
मात्र, या भीषण दुर्घटनेत अक्तर बेगम अमन उल्ला खान यांचा कारमध्येच मृत्यू झाला, तर जखमी सुलताना बी. बेगम यांचा बुलढाणा येथे उपचारासाठी नेत असताना रस्त्यातच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भरधाव दुचाकीस्वाराने क्रेटा कारला धडक दिल्यानंतर घटनास्थळावरून पलायन केले. दुचाकीस्वाराला वाचविण्याच्या प्रयत्नात चालकाने कार रस्त्याच्या कडेला घेतली. त्याचवेळी वाहनावरील ताबा सुटल्याने कार थेट रस्त्यालगतच्या खोल विहिरीत कोसळली.
कार विहिरीत कोसळल्याची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, रात्रीचा अंधार, विहिरीतील मोठ्या प्रमाणातील पाणी आणि आवश्यक बचाव साहित्याचा अभाव यामुळे बचावकार्यात अडथळे निर्माण झाले. स्थानिक नागरिकांनी रात्रभर उपलब्ध साधनांच्या मदतीने बचावकार्य करण्याचा प्रयत्न केला.
कार विहिरीत नेमकी कुठे अडकली आहे, याचा शोध घेणेही आव्हानात्मक ठरत होते. अखेर स्कुबा डायव्हर्सचे पथक घटनास्थळी दाखल झाले आणि पाण्यात उतरून कार बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू झाले. सलग १२ ते १३ तासांच्या प्रयत्नांनंतर कार विहिरीबाहेर काढण्यात यश आले.
पोलीस अधीक्षक तेघबीरसिंह संधू, उपविभागीय पोलिस अधिकारी नितीन कटेकर, पारध पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक संतोष माने तसेच तहसील प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली बचावकार्य राबविण्यात आले. पोलीस कर्मचारी, महसूल प्रशासन, स्थानिक नागरिक आणि स्कुबा डायव्हर्सच्या पथकाने बचावकार्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले.
कार बाहेर काढल्यानंतर त्यामध्ये अडकलेल्या अक्तर बेगम अमन उल्ला खान यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. दरम्यान, अपघातात जखमी झालेल्या सुलताना बी. बेगम यांना पुढील उपचारासाठी बुलढाणा येथे घेऊन जात असताना रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे या दुर्घटनेतील मृतांचा आकडा दोन झाला.
अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत रात्रभर बचावकार्य केले. मात्र, अत्याधुनिक बचाव साधने आणि प्रशिक्षित पथक वेळेत उपलब्ध न झाल्याने बचावकार्य लांबले. या विलंबाबद्दल नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
मदतीला यंत्रणा उशिरा; नागरिकांचा संताप
अपघातानंतर रात्रीच्या अंधारात स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, विहिरीत अडकलेली कार बाहेर काढण्यासाठी आवश्यक साधने आणि प्रशिक्षित बचाव पथक तातडीने उपलब्ध झाले नाही. त्यामुळे बचावकार्य तब्बल १२ ते १३ तास लांबले. अखेर स्कुबा डायव्हर्सच्या मदतीने कार बाहेर काढण्यात आली. या विलंबामुळे प्रशासनाच्या आपत्कालीन व्यवस्थेविरोधात नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे..