

Bhokardan Parad Blood Bank Scam
पारध : भोकरदन तालुक्यातील पारध येथे दरवर्षी छत्रपती शिवाजी महाराज जयंती, तसेच विविध महापुरुषांच्या जयंतीनिमित्त मोठ्या उत्साहात रक्तदान शिबिरांचे आयोजन केले जाते. सामाजिक बांधिलकीच्या नावाखाली राजकीय मंडळी, सामाजिक संस्था , शैक्षणिक संस्था, आणि विविध मंडळांकडून नागरिकांना रक्तदानासाठी आवाहन केले जाते. मात्र, प्रत्यक्ष गरजेच्या वेळी रक्त मिळत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
पारध येथे दरवर्षी राजर्षी शाहू बँकेच्या माध्यमातून भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात येते. उद्घाटन समारंभ, मोठमोठे बॅनर, प्रतिष्ठित पाहुणे, चहा-नाश्ता आणि फोटोसेशन यामध्ये कार्यक्रम रंगून जातो. “समाजासाठी मोठे कार्य” केल्याचे चित्र उभे केले जाते. परंतु गरजूंना वेळेवर रक्त मिळत नसल्याचा गंभीर आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे.
अनेक नागरिकांचा अनुभव असा आहे की, अपघात किंवा तातडीच्या उपचारावेळी रक्तासाठी संपर्क साधला असता “ब्लड संपले”, “सध्या उपलब्ध नाही”, “उद्या बघू” अशी उत्तरे दिली जातात. त्यामुळे रक्तदान करणाऱ्या तरुणांमध्ये नाराजी वाढत असून “आपण दिलेले रक्त नेमके कुठे जाते?” असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
सर्वसामान्य रक्तदात्यांचा उद्देश हा फक्त एखाद्याचा जीव वाचावा हाच असतो. “आज आपण रक्तदान करू, उद्या आपल्यालाही कोणीतरी मदत करेल” या भावनेतून अनेक युवक रक्तदान करतात. मात्र काही ब्लड बँका फक्त प्रमाणपत्र देऊन सामाजिक उपक्रमाचा दिखावा करत असल्याची चर्चा आता जोर धरू लागली आहे.
जर अशीच परिस्थिती राहिली, तर भविष्यात नागरिक रक्तदानापासून दूर जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. संबंधित प्रशासनाने या प्रकाराची गंभीर दखल घेऊन ब्लड बँकांची चौकशी करावी, रक्तसाठ्याची पारदर्शक माहिती जाहीर करावी आणि गरजूंना वेळेवर रक्त उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
आम्ही दरवर्षी विविध संस्था व मंडळांच्या रक्तदान शिबिरात उत्स्फूर्त सहभाग घेतो. स्वतःसोबत मित्रपरिवारालाही रक्तदानासाठी प्रोत्साहित करतो, कारण आपल्या रक्तामुळे एखाद्याचा जीव वाचावा हीच भावना असते. मात्र आजपर्यंत अनेक वेळा असा अनुभव आला की, गरजेच्या वेळी सर्वसामान्य नागरिकांना रक्त मिळत नाही. संबंधित संस्थांशी संपर्क साधला असता ‘आज नाही’, ‘उद्या बघू’, ‘परवा बघू’ अशी उत्तरे देऊन टाळाटाळ केली जाते. मग या रक्तदान शिबिरातून जमा झालेले रक्त नेमके जाते कुठे? याची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे. फक्त राजकीय पुढारी आणि पैसेवाल्यांनाच रक्त उपलब्ध होते का? सर्वसामान्य माणसाने जीव गमवायचा का? असे अनेक प्रश्न आता निर्माण होत आहेत.
- सागर राजे देशमुख (सामाजिक कार्यकर्ता)