

Proposal for assistance of Rs 421 crore submitted to the government
जालना, पुढारी वृत्तसेवा : सप्टेंबर महिन्यात जिल्ह्यात ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले. अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील ६ लाख ३ हजार ३९३ शेतकरी बाधित झाले आहे. या बाधित शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी सुमारे ४२१ कोटी ४१ लाख ४७ हजार २२५ रुपयांच्या मदतीचा प्रस्ताव प्रशासनाच्या वतीने शासनाकडे पाठवण्यात आला आहे. मात्र, शासनस्तरावरुन शेतकऱ्यांना अद्यापि मदत मिळाली नसल्यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
दरम्यान, यंदा जालना जिल्ह्यात मुसळधार पावसाने थैमान घातले. बहुतांश मंडळात अतिवृष्टी झाली. शिवाय, गोदावरीत जायकवाडी धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात आला. यामुळे गोदाकाठच्या गावात महापूर आला. शेती खरडून गेली. परिणामी, हातचे पिके वाया गेली. शेतकऱ्यांच्या नशिबी पुन्हा निसर्गान भोपळा दिला. या अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याचे जाहीर केले. मात्र, अजूनही मदत त्यांच्या पर्यंत पोहचली नाही. अजूनही तलाठी अर्थात ग्राम महसुल अधिकारी यांच्या माध्यमातून पंचनामे करण्यात येत आहे.
जालना जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले आहे. अतिवृष्टी व पूरग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी यासाठी जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या मार्गदर्शनात मुख्य कार्यकारी अधिकारी पी. एम. मिन्नू, अपर जिल्हाधिकारी रिता मेत्रेवार, निवासी उपजिल्हाधिकारी शशिकांत हदगल यांच्यासह उपजिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, जिल्हा परिषद यंत्रणा, तहसीलदार, जिल्हा कृषी अधिकारी, ग्रामसेवक, तलाठी, कृषी सेवकांनी युद्ध पातळीवर नुकसानीचे पंचनामे केले.
शासनाकडून अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना मदतीची घोषणा केलेली आहे. यानुसार, जिरायत शेतीसाठी ८ हजार ५०० रुपये प्रतिहेक्टरी तर बागायतीसाठी १७ हजार व फळपिकांसाठी २२ हजार ५०० रुपये प्रतिहेक्टरी मदत देण्याचे जाहीर करण्यात आले आहे. यानुसार, जिरायत शेतीच्या नुकसानीपोटी ३५७ कोटी ४६ लाख ६३ हजार ५२५ रुपयांची मागणी करण्यात आली आहे.
अंबड तालुक्यात सर्वाधिक ९३ हजार १२९ हेक्टर शेत पिकांचे नुकसान झालेले असल्याचे नमूद करण्यात आलेले आहे. जिल्ह्यातील ४ लाख ४९ हजार हेक्टरवरील पिके अतिवृष्टीमुळे बाधित झाल्याचे अहवालात नमूद करण्यात आलेले आहे. यात ४ लाख ५४९ हेक्टर जिरायत शेती, १ हजार २७५ बागायती तर २७ हजार ४५८ हेक्टर फळपिकांचे नुकसान झाले आहे.