

जालना : गेल्या सहा वर्षांत राष्ट्रीय आरोग्य अभियान (एनएचएम) आणि जिल्हा वार्षिक योजनेच्या (डीपीसी) माध्यमातून कोट्यवधींचा निधी खर्च करण्यात आला असून, जिल्ह्यात ८ नवीन प्राथमिक आरोग्य केंद्रे (पीएचसी) आणि ७ आरोग्य उपकेंद्रांच्या दिमाखदार इमारती उभ्या राहिल्या आहेत.
राष्ट्रीय आरोग्य अभियान (एनएचएम) अंतर्गत जिल्ह्यातील ग्रामीण आरोग्य सेवेचे जाळे अधिक सक्षम करण्यासाठी पावले उचलण्यात आली आहेत. जिल्ह्यात नव्याने ८ प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या इमारती उभारण्यात आल्या आहेत. यापैकी पाच केंद्रांसाठी प्रत्येकी ६ कोटी ५० लाख रुपये, तर उर्वरित तीन केंद्रांसाठी प्रत्येकी ४ कोटी ९० लाख रुपये असा एकूण ४७ कोटी ८० लाखांचा भरघोस निधी मंजूर करण्यात आला होता. यातून इमारतींची कामे पूर्ण झाली असून, पाच नव्या इमारती आरोग्य विभागाकडे हस्तांतरित देखील करण्यात आल्या आहेत. उर्वरित तीन इमारतींच्या हस्तांतरणाची प्रक्रिया सध्या अंतिम टप्प्यात आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्रांसोबतच ७ नवीन आरोग्य उपकेंद्रांच्या इमारतीही उभारण्यात आल्या आहेत. प्रत्येक उपकेंद्रासाठी ९० लाखांच्या निधीची तरतूद करण्यात आली होती, ज्यासाठी एकूण ६ कोटी ३० लाख रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. या सर्व उपकेंद्रांची बांधकामे पूर्ण झाली असून, यामुळे दुर्गम व ग्रामीण भागातील रुग्णांना उपचारांसाठी शहराकडे धाव घेण्याची वेळ येणार नाही.
नवीन इमारती आणि जुन्या केंद्रांच्या दुरुस्तीमुळे जिल्ह्यातील ग्रामीण आरोग्य व्यवस्थेचा पाया मजबूत झाला आहे. या अद्ययावत सुविधांमुळे मातृ-शिशू आरोग्य, लसीकरण, साथीच्या आजारांवरील उपचार आणि विविध राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांची अंमलबजावणी अधिक प्रभावीपणे होणार असल्याने ग्रामीण जनतेला मोठा दिलासा मिळाला आहे.
देखभाल दुरुस्तीचीही कामे हाती घेतली जाणार
जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत (डीपीसी) सन २०२०-२१ ते २०२५-२६ या कालावधीत जिल्ह्यातील जुन्या प्राथमिक आरोग्य केंद्रे व आरोग्य उपकेंद्रांच्या देखभाल आणि दुरुस्तीची कामे हाती घेण्यात आली होती. यासाठी सरासरी प्रत्येकी १० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला. सन २०२० ते २०२५ या कालावधीत मंजूर झालेली बहुतांश कामे पूर्ण झाली असून, २०२५-२६ मधील काही कामे अंतिम टप्प्यात आहेत.
आरोग्य सुविधा देणे हेच मुख्य उद्दिष्ट - जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रे व आरोग्य उपकेंद्रांच्या दुरुस्तीची तसेच नव्या इमारतींची कामे नियोजनानुसार पूर्ण करण्यात आली आहेत. पाच केंद्रांच्या इमारतींचे हस्तांतरण पूर्ण झाले आहे. उर्वरित तीन इमारतींच्या हस्तांतरणाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहेत. ती पूर्ण होताच तेथे तातडीने आरोग्य सेवा सुरू केली जाईल.
डॉ. जयश्री भुसारे, जिल्हा आरोग्य अधिकारी, जालना.