

Jalna 1400 gram panchayat employees on strike
जालना, पुढारी वृत्तसेवा : गत सहा महिन्यांपासून ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना वेतन न मिळाल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. यामुळे सोमवार दि. २२ रोजी पासून जिल्हाभरातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषदेसमोर बेमुदत धरणे आंदोलन पुकारले आहे.
दरम्यान, पंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना या संदर्भात महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियन व कामगार सेनेच्यावतीने निवेदन सादर करण्यात आले. त्यात म्हटले, की एप्रिल महिन्यापासून कर्मचाऱ्यांचे वेतन थकले आहे. तब्बल पाच महिन्यांपासून हे वेतन थकल्यामुळे कर्मचाऱ्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे.
यामुळे कर्मचाऱ्यांत तीव्र असंतोषाची भावना निर्माण झाली आहे. एप्रिल आणि मे या दोन महिन्यांचे वेतन जिल्हा परिषद येथे जूनपासून जमा झाले आहे. ते अद्यापि कर्मचाऱ्यांना अदा करण्यात आले नाही. या संदर्भात वारंवार लेखी व तोंडी स्वरुपाची तक्रार करूनही संबंधित अधिकाऱ्यांनी दखल घेतली नाही. या संदर्भात मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या पार्श्वभूमीवर बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता.
त्यानुसार सोमवार दि. २२ रोजी पासून जिल्हा परिषद कार्यालयासमोर ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी बेमुदत कामबंद आंदोलन पुकारले आहे. यावेळी महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियनचे जिल्हाध्यक्ष दिलीप राठोड, जिल्हा सचिव प्रकाश जाधव, प्रभू गायकवाड, संदीप अशोक पवार, कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष विष्णू भुतेकर, जिल्हा सचिव कारभारी आधाळेंसह सचिव भागवत ढगे, सदस्य भागवत कोकणे, विजय सोनुने मारोती धवडे आदींसह ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.