

बालाजी कुलकर्णी
मंठा : भक्ताच्या हाकेला धावणारी व मनोमन इच्छा पूर्ण करणारी देवी म्हणून मंठा तालुक्यातील जगदंबा देवी पंचक्रोशीत परिचित आहे. मंठा शहराच्या उत्तरेस निसर्गरम्य वातावरणात देवीचे भव्य मंदिर आहे. सोमवार पासुन देवीच्या शारदीय नवरात्र महोत्सवास प्रारंभ होत आहे. या महोत्सवास सेलू, पाथरी, जिंतूर, परभणी, जालना, लोणार, संभाजीनगर येथून भाविक दर्शनासाठी गर्दी करतात.
जगदंबा देवी संस्थानच्या वतीने शारदीय नवरात्र महोत्सवास तयारीस सुरुवात झाली आहे. तालुक्यातील आराध्य दैवत म्हणून जगदंबा देवीची ओळख आहे. देवी बाबतची कथा आहे की, टोकवाडी येथील जिजाबाई नावाची महिला देवीची भक्त होती. ती दररोज सध्या असलेल्या मंदिराच्या पश्चिमेकडील डोंगरावर एका छोट्या देवी मदिरात दर्शनासाठी जात आसे.
देवीने एक दिवस जिजाबाईची परीक्षा पाहण्याचे ठरविले. देवी जिजाबाईस प्रसन्न होऊन म्हणाली की मला तुझ्या सोबत यायचे आहे. मी तुझ्या गाडीत पाठी मागे बसते. पण तू कोणत्याही परिस्थितीत मागे वळून पाहायचे नाही. तू मागे वळून पाहिले तर मी त्या ठिकाणीच थांबेल असे देवीने सांगितले. देवीचा प्रवास जिजाबाईच्या गाडीत सुरू झाला. मात्र थोड्याच अंतरावर गाडा हलका लागल्याने घाई घाईत जिजाबाई ने पाठीमागे वळून पाहिले. त्यामुळे देवी तिथेच थांबली.
दरवर्षी मंदिर परिसरात नवरात्र व चैत्र पौर्णिमेला मोठी यात्रा भरते नवरात्रातील अष्टमीच्या दिवशी भक्तगण मोठ्या संख्येने दर्शनासाठी येत असतात. नवरात्रात अनेक भाविक या ठिकाणी नऊ दिवस मुक्काम करून घटी बसण्याची परंपरा आहे. जगदंबा देवी मंदिर संस्थानच्या वतीने दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी विधीवत व परंपरागत घटस्थापना करून शारदीय नवरात्र महोत्सवास प्रारंभ होत असतो. त्याच बरोबर धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असते. नवमीच्या दिवशी विधीवत होम हवन व पूर्णाहुतीचा कार्यक्रम पार पडतो. विजयादशमीच्या दिवशी नवरात्रोत्सवाची सांगता केली जाते.