

जाफराबाद :जाफराबाद तालुक्यातील जवखेडा ठेंग येथे गावाच्या मुख्य मार्गावर डंपरभर दगड, मुरूम व माती टाकून रस्ता अडविण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अवैध जागेवर अतिक्रमण करून पत्र्याचे शेड उभारण्यासाठी जाणीवपूर्वक हा प्रकार केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
गावकऱ्यांच्या माहितीनुसार, हा रस्ता शाळकरी मुले, शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. मात्र अचानक दगडांचा मोठा ढीग टाकून मार्ग बंद करण्यात आल्याने नागरिकांना पर्यायी मागनि वळसा घालावा लागत असून मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
काही अधिकाऱ्यांचे अवैध वाळू उत्खनन प्रकरणाशी संगनमत असल्यामुळे गावकऱ्यांच्या तक्रारींकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा गंभीर आरोपही नागरिकांनी केला आहे. गावाचा मुख्य रस्ता बंद होतो आणि प्रशासन मात्र बघ्याची भूमिका घेतो, ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे.
दरम्यान, प्रशासनाने तातडीने अतिक्रमण हटवून मुख्य मार्ग मोकळा करावा व संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
तक्रार करूनही कारवाई नाही
घटनेबाबत ग्रामस्थांनी ग्रामपंचायत, पंचायत समिती तसेच तहसील कार्यालयात तक्रार दाखल केली आहे. तहसीलदार मंगेश साबळे यांनाही माहिती देण्यात आली. मात्र तब्बल १८ तास उलटूनही कोणताही जबाबदार अधिकारी घटनास्थळी दाखल न झाल्याने ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.