

Install a statue of Tathagata Buddha in Moti Lake, demand of community members
जालना, पुढारी वृत्तसेवा : मोती तलावात तथागत बुध्दांची मूर्ती बसवण्याची समाजबांधवांची अनेक दिवसांपासूनची मागणी प्रलंबित आहे. मात्र, या मागणीकडे पालिका प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करून त्वरित गौतम बुध्दांची मूर्ती मोती तलावात बसवावी, या मागणीसाठी बौध्द समाजबांधवांच्या वतीने सोमवार दि. १५ रोजी महापालिका आयुक्त संतोष खांडेकर यांच्या दालनात ठिय्या आंदोलन करण्यात आले.
दरम्यान, मोती तलावात हैदराबादच्या हुसेन सागरच्या धर्तीवर तथागत गौतम बुध्दांची मूर्ती बसवावी, अशी समस्त बौद्ध समाजाची मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. यापू-र्वीही अनेकवेळा निवेदन दिल्यानंतरही पालिका प्रशासनाने कोणतेही ठोस पाऊले उचलले नाही. यामुळे संताप व्यक्त करण्यात आला. सोमवार दि. १५ रोजी सकाळपासून समाजबांधव पालिकेच्या गेटवर आयुक्तांची वाट पाहत उभे होते.
तब्बल दोन तासांपर्यंत आयुक्त दालनात न आल्याने अखेर बौद्ध समाजबांधवांनी थेट आयुक्तांच्या दालनात ठिय्या आंदोलन सुरू केले. या आंदोलनाला वंचित बहुजन आघाडीचा पूर्ण पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे. वंचित बहुजन आघाडीचे युवक जिल्हाध्यक्ष विजय लहाने यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, बौद्ध समाजाची मागणी योग्य असून, आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत.
आयुक्त संतोष खांडेकर यांनी याबाबत तातडीने निर्णय घ्यावा. अन्यथा दोन दिवसांत आम्ही समाजासोबत संयुक्त बैठक घेऊन मोठ्या प्रमाणात निषेध आंदोलन उभारू, असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे युवक जिल्हाध्यक्ष विजय लहाने यांनी दिला. मोती तलाव परिसरात तथागत गौतम बुद्धांची मूर्ती बसवण्याची मागणी मान्य केली नाही तर तीव्र आंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा समाजबांधवांच्या वतीने देण्यात आला.
वंचित बहुजन आघाडीचे युवक जिल्हाध्यक्ष विजय लहाने म्हणाले, की मोती तलावात तथागत गौतम बुध्दांची मूर्ती बसवण्याची समाजाची अनेक दिवसांची मागणी आहे. ती मागणी योग्य असून, आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. आयुक्त संतोष खांडेकर यांनी याबाबत तातडीने निर्णय घ्यावा. अन्यथा दोन दिवसांत आम्ही समाजासोबत संयुक्त बैठक घेऊन मोठ्या प्रमाणात निषेध आंदोलन उभारू, असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे युवक जिल्हाध्यक्ष विजय लहाने यांनी दिला.