

Case against 30 people in electricity theft case
जालना, पुढारी वृत्तसेवाः वीजबिलाच्या थकबाकीसाठी महावितरणने वीजपुरवठा कायमस्वरूपी खंडित केलेला असतानाही तो परस्पर जोडून घेणे ३० ग्राहकांच्या चांगलेच अंगलट आले आहे. या सर्वांवर वीजचोरी तसेच महावितरणच्या यंत्रणेशी छेडछाड केल्याप्रकरणी थेट पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. महावितरणच्या या धडक कारवाईमुळे वीजचोरांमध्ये खळबळ उडाली आहे. यापूर्वी अशा प्रकरणांत जिल्ह्यात १६ गुन्हे दाखल झालेले आहेत.
भोकरदन ग्रामीण शाखेचे कनिष्ठ अभियंता प्रदीप सातदिवे यांनी सहकाऱ्यांसह तडेगावात तपासणी मोहीम राबवली. यावेळी गावातील सहा ते सात ग्राहकांनी ४६ हजार २५४ रुपयांचे वीजबिल न भरल्यामुळे त्यांचा वीजपुरवठा कायमस्वरूपी बंद करण्यात आला होता. त्यानंतरही त्यांनी अज्ञात इसमाच्या साह्याने लघुदाब वाहिनीला छेडछाड केली आणि आकडे टाकून विजेचा अनधिकृतपणे वापर केला. या ग्राहकांनी महावितरणचे ६० हजार ५१० रुपयांचे आर्थिक नुकसान केले. त्यांना जोडभारानुसार १२ हजार रुपये तडजोड शुल्कही आकारण्यात आले.
राजूर शाखेचे सहायक अभियंता आदित्य खंडीझोड यांनी सहकाऱ्यांसह तपोवन गावात तपासणी मोहीम राबवली. गावातील सात ग्राहकांनी ६० हजार ५४६ रुपयांचे वीजबिल न भरल्यामुळे त्यांचा वीजपुरवठा कायमस्वरूपी बंद करण्यात आलेला होता. त्यानंतरही त्यांनी अज्ञात इसमाच्या साह्याने लघुदाब वाहिनीला छेडछाड केली आणि आकडे टाकून विजेचा अनधिकृतपणे वापर केला. या ग्राहकांनी महावितरणचे ७० हजार ५९० रुपयांचे आर्थिक नुकसान केले. त्यांना जोडभारानुसार १४ हजार रुपये तडजोड शुल्कही आकारण्यात आले.
भोकरदन शहर शाखेचे सहायक अभियंता प्रमोद दारकोंडे यांनी सहकाऱ्यांसह दावतपूर गावात तपासणी मोहीम राबवली. गावातील नंदाबाई दादाराव घायवट, प्रभाकर किसन घायवट, विश्वास त्रिंबक घायवट, अण्णा वामनराव देशपांडे, रमेश नामदेव घायवट, शंकर कृष्णा घायवट, अशोक फकीर घायवट व रुबिंद्र नारायण घायवट या ग्राहकांनी १ लाख ८० हजार ८६६ रुपयांचे वीजबिल न भरल्यामुळे त्यांचा वीजपुरवठा कायमस्वरूपी बंद करण्यात आलेला होता. त्यानंतरही त्यांनी अज्ञात इसमाच्या साह्याने लघुदाब वाहिनीला छेडछाड केली आणि आकडे टाकून विजेचा अनधिकृतपणे वापर केला. या ग्राहकांनी महावितरणचे ५९ हजार ६५० रुपयांचे आर्थिक नुकसान केले. त्यांना जोडभारानुसार १६ हजार रुपये तडजोड शुल्कही आकारण्यात आले.
हसनाबाद शाखेचे कनिष्ठ अभियंता मयूर बुलगे यांनी सहकाऱ्यांसह जानेफळ मिसाळ गावात तपासणी मोहीम राबवली. गावातील पाच ग्राहकांनी ६१ हजार ६५५ रुपयांचे वीजबिल न भरल्यामुळे त्यांचा वीजपुरवठा कायमस्वरूपी बंद करण्यात आलेला होता. त्यानंतरही त्यांनी अज्ञात इसमाच्या साह्याने लघुदाब वाहिनीला छेडछाड केली आणि आकडे टाकून विजेचा अनधिकृतपणे वापर केला.
वीज चोरी करणाऱ्या आरोपींवर भोकरदन व जालन्यातील सदर बाजार पोलिस ठाण्यात विद्युत कायद्याच्या कलम १३५ व १३८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापूर्वी अशा प्रकरणांत १६ ग्राहकांवर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. आतापर्यंत जालना जिल्ह्यात परस्पर वीज जोडून वीजचोरी करणाऱ्या ४६ ग्राहकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.