

Implement the Anti-Superstition and Black Magic Act.
जालना, पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध करणारा व त्यांचे समूळ उच्चाटन करणारा अधिनियम, 2013 (अंधश्रद्धा निर्मलन कायदा) यांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे आवाहन अपर जिल्हाधिकारी रमेश मिसाळ यांनी केले आहे.
जादूटोणा विरोधी कायदा राज्यस्तरीय समितीच्या अनुषंगाने जिल्हास्तरीय आढावा बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयात अपर जिल्हाधिकारी रमेश मिसाळ यांच्या अध्यक्षेत संपन्न झाली. यावेळी बैठकीत महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध करणारा व त्यांचे समूळ उच्चाटन करणारा अधिनियम, 2013 (अंधश्रद्धा निर्मलन कायदा) यांच्या प्रभावी अंमलबजावणीबाबत सविस्तर चर्चा आली.
बैठकीत करण्यात नागरिकांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करणे, अंधश्रद्धा व जादूटोणा यांच्या नावाखाली होणाऱ्या फसवणूक, शोषण आणि अमानुष कृत्यांना आळा घालणे तसेच कायद्याबाबत जनजागृती वाढविणे यावर भर देण्यात आला.
या कायद्यानुसार नरबळी देणे, भूतबाधा किंवा जादूटोणा काढण्याच्या नावाखाली व्यक्तींना शारीरिक किंवा मानसिक त्रास देणे, चमत्काराचे खोटे दावे करून आर्थिक फसवणूक करणे, अघोरी प्रथा राबविणे महिलांवर जादूटोणा केल्याचा आरोप करून छळ करणे आदी कृत्ये दंडनीय गुन्हे आहेत.
...तर कारवाई
हा कायदा कोणत्याही धर्माच्या श्रद्धा, पूजा, प्रार्थना, व्रत-उपवास किंवा धार्मिक विधींवर बंदी घालत नाही. फक्त त्या धार्मिक किंवा सामाजिक प्रथांमुळे जर फसवणूक, शोषण किंवा अमानुष वर्तन होत असेल तर त्यावर कारवाई केली जाते. तक्रार कुठे करावी ? जवळचे पोलिस ठाणे, जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय संबंधित शासकीय यंत्रणा सबब आपल्या आजू-बाजूस काही अनिष्ट, अघोरी, अमानुष प्रथा व जादूटोणा अशा घटना घडत असतील त्यांनी नजिकच्या पोलिस स्टेशनला संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हाधिकारी तथा अप्पर जिल्हाधिकारी रमेश मिसाळ यांनी केले आहे.