Sangli News|भोंदू बाबांविरोधात कठोर पावले उचला

सामाजिक कार्यकर्त्यांची मागणी; जादूटोणाविरोधी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी नाही
Fraud godmen
Fraud godmen
Published on
Updated on

सांगली : भोंदू अशोक खरात या ज्योतिषाचे कारनामे समोर येत आहेत. अनेक महिलांचे शोषण त्याने केले आहे. अनेक राजकारणी त्याच्या पाठीशी आहेत. खरात याच्यासारखे भोंदू संपूर्ण महाराष्ट्रात आहेत. राजकारणी त्यांच्या मागे असल्याने पोलिस त्यांच्यावर कारवाई करीत नाहीत. जादूटोणाविरोधी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होताना दिसत नाही. त्यामुळे भोंदूंवर कठोर कारवाई होत नाही. सरकारने याबाबत कठोर पावले उचलावीत, अशा प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या.

विकृतीविरोधात सरकारने पुढाकार घ्यावा

अंनिसचे डॉ. प्रदीप पाटील म्हणाले, अशोक खरात याच्याकडून महिलांचे लैंगिक शोषण झाले. अशा पद्धतीची बुवाबाजी नवीन नाही. वर्षानुवर्षे हे सुरू आहे. बुवाबाजीविरोधात ना सरकार प्रयत्न करीत आहे, ना कुठलीही वैद्यकीय संस्था. या प्रश्नाचे मूळ हे सामाजिक, मानसिक विकृतीमध्ये आहे. ही विकृती राजकारणी, श्रीमंत व्यक्तींमध्ये आहे. तसेच गरीब व महिला यात बळी जात आहेत. समाजाच्या पुऱ्या न होणाऱ्या वैयक्तिक समस्या जोपर्यंत सुटत नाहीत, तोपर्यंत शोषण हे होतच राहणार. अंनिसने बुवाबाजीविरोधात आवाज उठविला आहे. तसेच लोकांच्या समस्या सुटाव्यात म्हणून मानसिक आरोग्य केंद्र सुरू केले आहे. परंतु हा प्रयत्न अतिशय लहान स्वरुपाचा आहे. याला मोठे स्वरुप यायचे असेल तर सरकार, समाजाने प्रयत्न केले पाहिजे. खरात सारख्या व्यक्तींकडे स्त्रिया जात असतील व आपले लैंगिक शोषण होत आहे, हे त्यांना समजत नसेल तर हे त्यांचे अज्ञान आहे. त्या अज्ञानाच्या बळी ठरत आहेत. लैंगिकता शिक्षण हा देखील उपाय करण्याची आवश्यकता आहे.

भोंदूंच्या मागे राजकारणी, हे दु:खदायक

जिल्हा परिषदेच्या माजी समाजकल्याण सभापती छाया खरमाटे म्हणाल्या, खरातचे प्रकरण समोर आल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात संताप व्यक्त होत आहे. असा एकच भोंदूबाबा नाही, तर राजाश्रयामुळे अनेक किती तरी खरात आपली काळी कृत्ये उघडपणे करण्याचे धाडस दाखवत आहेत. महाराष्ट्र सरकारने त्यांना पाठीशी न घालता त्यांना कठोर शिक्षा होईल, असे प्रयत्न करावेत. निरक्षर, अज्ञानी, पिचलेल्या महिलांच्या मानसिकतेचा गैरफायदा घेत असे बुवा महिलांचे शोषण करीत आहेत. वास्तविक पाहता अशा महिलांना आधाराची गरज आहे. परंतु असे न घडता भोंदूंना पाठीशी घालण्याचे काम सुरू आहे. त्याला राजकारणी खत-पाणी घालत आहेत. हे अत्यंत दु:खदायक असून, महाराष्ट्रातील अशा अनेक भोंदूंचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे. शोषण होत असेल तर महिलांनी तक्रार देण्यासाठी पुढे आले पाहिजे.

दक्षता समितीची अंमलबजावणी नाही

सांगली अंनिसचे कार्यकर्ते राहुल थोरात म्हणाले, अंधश्रद्धेपोटी अनेक बुवा, महाराज महिलांचे शोषण करीत आहेत. याविरोधात अंनिस गेली अनेक वर्षे चळवळ करीत आहे. याविरोधात कायदा व्हावा म्हणून आंदोलने केली. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी कायदा व्हावा म्हणून प्राण पणाला लावले. अखेर यासंदर्भात कायदा करण्यात आला. परंतु त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही. कायद्यानुसार बुवा, महाराज यांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी प्रत्येक पोलिस ठाण्यात दक्षता समितीची स्थापना करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. परंतु अद्याप त्याची अंमलबजावणी झालेली नाही. वास्तविक पाहता सरकारने अंधश्रद्धेविरोधी जागृती करण्याचे उपक्रम हाती घेणे अपेक्षित होते. परंतु ते होताना दिसत नाही. उलट सरकारमधील लोकच खरातसारख्या भोंदूच्या मागे उभे असल्याचे दिसून आलेले आहे. त्यामुळे आता यासंदर्भात गंभीर विचार करण्याची वेळ आलेली आहे.

पीडितांनी निर्भयपणे तक्रार करावी

महाराष्ट्र अंनिसचे राज्य कार्याध्यक्ष संजय बनसोडे म्हणाले की, पीडितांनी निर्भयपणे तक्रार केली पाहिजे. पोलिसांनी काही प्रकरणात स्वतः फिर्यादी व्हावे. संघटना सातत्याने प्रबोधन आणि संघर्ष करीत आहे. कायद्याबाबत सातत्याने जनजागृती करावी लागणार आहे. तरुणांनी आपल्या गावात कोणताही बुवाबाबा, मांत्रिक येता कामा नये, याची दक्षता घेतली पाहिजे. समाज, शासन आणि राजकारण या सर्वांनी मिळून अशा प्रवृत्तीचा निर्णायक अंत करण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news