

पिंपळगाव रेणुकाई ः जालना उत्तर (प्रादेशिक) वनपरिक्षेत्र व भोकरदन वनपरिमंडळाच्या पथकाने भोकरदन तालुक्यातील आन्वा येथे धाड टाकून अवैधरीत्या तोडून साठवून ठेवलेल्या कडुलिंब लाकडाचा मोठा साठा जप्त केला आहे. या प्रकरणी धावडा येथील एका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नियतक्षेत्रात गस्त घालत असताना आन्वा शिवारात अवैध वृक्षतोड करून माल लपवून ठेवल्याची गोपनीय माहिती वनविभागाला मिळाली. त्यानुसार तातडीने पथकाने घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली असता 5.528 घनमीटर कडुनिंबाचे लाकूड आढळून आले. पंचनामा करून संपूर्ण माल जप्त करण्यात आला.
ही कारवाई वनसंरक्षक छत्रपती संभाजीनगर प्रमोदचंद लाकरा, उपवनसंरक्षक श्रीमती सुवर्णा माने, सहाय्यक वनसंरक्षक (रोहयो व वन्यजीव) जालना सुदाम न. मुढे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
वनपरिक्षेत्र अधिकारी जालना उत्तर (प्रा.) श्रीमती निता फुले यांच्या नेतृत्वात वनपरिमंडळ अधिकारी भोकरदन वाय. एम. डोमळे, वनरक्षक ज्ञानेश्वर पवार, जयाजी शिनगारे, घनश्याम गव्हाणे व मंगेश संपकाळ यांनी संयुक्तपणे ही धडक मोहीम राबवली. सदर वन गुन्ह्याचा पुढील तपास वनविभागामार्फत सुरू आहे.