

ताडकळस : ताडकळस पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध दारू वाहतुकीविरोधात पोलिसांनी धडक कारवाई करत 5 लाख 26 हजार 925 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पिंगळी-लिंबळा मार्गावर केलेल्या या कारवाईत देशी दारू, बिअर आणि वाहतुकीसाठी वापरलेली कार जप्त करण्यात आली असून चालक मात्र पोलिसांना चकवा देत फरार झाला.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दि. 24 एप्रिल रोजी सकाळी 6.30 वाजता पिंगळी-लिंबळा सार्वजनिक रस्त्यावर संशयित MH 14 HG 4073 क्रमांकाच्या पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट डिझायर कारची तपासणी करण्यात आली. पोलिसांची चाहूल लागताच चालकाने कार रस्त्यात सोडून घटनास्थळावरून पळ काढला.
कारच्या तपासणीत 24 हजार रुपये किमतीच्या ‘भिंगरी संत्रा’ देशी दारूच्या 600 बाटल्या, 2 हजार 925 रुपये किमतीच्या किंगफिशर स्ट्राँग प्रीमियम बिअरच्या 15 बाटल्या आणि 5 लाख रुपये किमतीची स्विफ्ट डिझायर कार असा एकूण 5,26,925 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी गु.र.नं. 119/2026 अन्वये महाराष्ट्र प्रोव्हिजन कायदा कलम 65 (इ) अंतर्गत अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोशि राम विनायक सोळंके यांनी फिर्याद दिली असून सपोनि श्री मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली. सदर गुन्हा पोहेकॉ शिंदे यांनी दाखल केला असून पुढील तपास पोहेकॉ रनेर करीत आहेत. अवैध मद्य वाहतुकीविरोधात पोलिसांनी अशीच कठोर कारवाई सुरू ठेवणार असल्याचे सांगण्यात आले.