

पारध, पुढारी वृत्तसेवाः भोकरदन तालुक्यातील पारध येथे रविवारी हिडिंबा देवी यात्रेनिमित्त हिडिंबा देवी मंदिर आणि पराश्ववर महाराजांच्या मंदिराच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होणार आहे.
पारध परिसरात हिडिंवा देवीची उपासना शेकडो वर्षांपासून सुरू आहे. लोकमान्यतेनुसार, महाभारतातील भीमसेन यांची पत्नी हिडिंबा मातेचे पारध शाह राजा येथे दरवर्षी मिरवणूक काढून पूजन केले जाते. या देवीला शक्तिस्वरूप मानून भाविक विशेष पूजाअर्चा करतात. यात्रेच्या दिवशी सकाळपासून मंदिर परिसरात धार्मिक विधी, पूजन व विविध कार्यक्रम होतात. पारधमध्ये ऋषीमुनी पर-1श्ववर महाराजांचे प्रसिद्ध मंदिरही आहे. यात्रे दरम्यान येथे दर्शनासाठी भाविकांची प्रचंड गर्दी होत असते. सकाळपासून रात्रीपर्यंत भक्तांचा ओघ सुरूच राहतो. भाविक पराश्ववर महाराजांच्या समाधी व मंदिरात दर्शन घेऊन संकल्प पूर्ण करतात. हिडिंबा देवीचे पूजन आणि पराश्ववर महाराजांचे दर्शन यामुळे यात्रेला अधिक आध्यात्मिक महत्त्व प्राप्त होते.
मंदिर परिसरात यात्रेची तयारी करण्यात आली आहे. रविवारी दुपारी पालखी मिरवणूक सोहळा तसेच भजन कार्यक्रम होणार आहे. यावेळी पारंपरिक दांडपट्टा, लाठी-काठी आणि लोककलेचे सादरीकरण मिरवणुकीत करण्यात येणार आहे. यात्रेनिमीत्त मंदिर परिसर स्वच्छतेने उजळून निघाला असून विजेच्या रोषणाईने सजावट करण्यात आली आहे. पोलिस प्रशासनाने यात्रेच्या काळात सुरक्षा व्यवस्था आणि वाहतूक नियोजन केले आहे. स्थानिक युवकही यात्रेसाठी परिश्रम घेतात.
एकतेचे प्रतीक
हिडिंबा यात्रा ही केवळ धार्मिकच नव्हे तर सामाजिक एकतेचे प्रतीक मानली जाते. यात्रेत सर्व जाती-धर्मांचे लोक सहभागी होतात. त्यामुळे या परंपरेला एक ऐतिहासिक वारसा लाभला असून, श्री समाजातील सलोखा व ऐक्य वृद्धिंगत करणारा हा सोहळा आहे.