

Hemadpanti Shiva Temple in poor condition, some parts on the verge of collapse
आन्वा, पुढारी वृत्तसेवा : भोकरदन तालुक्यातील आन्वा येथील हेमाडपंती शिवमंदिर भाविकांसह पर्यटक, अभ्यासकांसाठी महत्त्वाचे आहे; परंतु देखभाल दुरुस्तीअभावी या हेमाडपंती मंदिराची मोठी दुरवस्था झाली आहे.
मराठवाड्यातील ऐतिहासिक मंदिरांपैकी एक म्हणून आन्वा येथील हेमाडपंती शिवमंदिराला (मढ) ओळखले जाते. हे मंदिर चार मीटर उंच उपपीठावर बांधण्यात आले आहे. आन्वा येथे इ.स. १०५० मध्ये मंदिराची निर्मिती झाल्याचे सांगितले जाते. हे मंदिर (मढ) पर्यटन क्षेत्रात येत असल्याने भाविक व पर्यटक येथे सतत येतात. या मंदिराची सध्या दुरवस्था झाली आहे. मात्र, याकडे पुरातत्त्व विभागाचे दुर्लक्ष होत आहे.
या मंदिराचा काही भाग ढासळण्याच्या मार्गावर आहे. काही वर्षांपूर्वी या मंदिराच्या देखभालीसाठी पुरातन विभागाचा कर्मचारी कार्यरत होता; परंतु काही वर्षांपूर्वी या वस्तूचे देखभाल करण्यासाठी एक कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती, परंतु गेल्या दोन दशकांपासून येथे एकही कर्मचारी नाही.
२०१७ मध्ये छत्रपती संभाजीनगर पुरातत्त्व विभागाने मंदिराच्या दुरुस्तीसाठी एक कोटी १५ लाख रुपयांचा निधी मंजूर केला होता. त्यामध्ये मंदिरावरील छत, मंदिरासमोरील ओटा (चबुतरा) व आवारातील दुरुस्ती, काही प्रमाणात नक्षीकाम करण्यात आले होते. हे झालेली विकास कामेही दर्जेदार झालेली नसल्याने आरोप ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आला आहे.
दक्षिण भारतीय आणि मध्य भारतीय स्थापत्यकला महाराष्ट्रातील १० सर्वात सुंदर मंदिरात एक आन्वा येथील हेमाडपंती मंदिर असून याचा १० क्रमांक आहे. या मंदिराला भेटण्यासाठी संभाजीनगर ते जळगाव महामार्गावरील गोळेगाव येथून पश्चिमकडे १० किलोमीटर अंतरावर आहे, हे मंदिर भगवान विष्णूच्या प्रतिमा असल्या तरी ते भगवान शिवाला समर्पित आहे. ते शिव आणि वैष्णव धर्माचे मिश्रण आहे. ते अजूनही मजबूत उभे आहे आणि आजूबाजूला सुंदर कोरीवकाम आहे. ते १० व्या शतकातील आहे. मंदिरात हेमाडपंती शैलीत बांधलेला एक सभामंडप (खुली जागा) आहे.
मंदिराच्या पाठीमागील चबुतऱ्याचे काम झालेले नाही. केवळ समोरील भागात काम केलेले दिसते. पुरातत्त्व विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने या मंदिराची मोठी दुरवस्था झाली आहे. याकडे संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन या मंदिराची दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.