

Poor condition of Anwa Primary Health Center
आन्वा, पुढारी वृत्तसेवा : नागरिकांच्या आरोग्याची काळजी वाहणाऱ्या आन्वा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परिसराच्या साफसफाईकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. आरोग्य केंद्राला झाडाझुडपांनी वेढा घातलेला आहे.
परिसराची साफसफाई करून केंद्रात नवचैतन्य निर्माण करण्याची गरज आहे. लाखो रुपये खर्च करून आधुनिक सोयीसह आरोग्य केंद्राची इमारत बांधण्यात आली. आन्वा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णांची नेहमीच वर्दळ असते. परंतु आरोग्य केंद्राचा परिसर बघताच येथे येणाऱ्यात नैराश्य निर्माण होते. सर्वत्र केरकचरा साचला असून परिसरात झाडेझुडपे वाढलेली आहेत. परिसर समतल करण्याची गरज असून याकडे मात्र आरोग्य प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.
आरोग्य केंद्र परिसरातील झाडाझुडपांत सदैव विषारी प्राण्यांचा मुक्त संचार राहतो. त्यांचा आरोग्य कर्मचाऱ्यांच्या तथा रुग्णांच्या जीवितास धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे गाजर गवत व काटेरी झुडपांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. या विपरीत परिणाम येथे येणारे रुग्ण व नागरिकांवर पडत आहे.
आन्वासह परिसरातील रुग्ण उपचारासाठी व बाळांतपाणासाठी व कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया करण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार घेण्यासाठी येतात. प्राथमिक आरोग्य केंद्राचा परिसरातील पसरलेल्या गाजर गवत व जागोजागी उकीरडे पाहून तो बरा होण्याऐवजी आणखीन आजारी पडेल अशी स्थिती निर्माण झाली आहे. याकडे आरोग्य विभागाने लक्ष घालण्याची गरज आहे.
आरोग्य केंद्रात राहणाऱ्या रुग्णांना व उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना मोठ्या प्रमाणात डासांचा सामना करावा लागत आहे. या डासांमुळे मलेरिया, डेंग्यू, टायफाईड आदी आजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. परिसरात वाढलेले गवत व काटेरी झाडेझुडपे या साप, विच्चू, यांना आश्रय मिळतो व परिसरात पसरलेल्या घाणीमुळे येथील स्थायिक राहाणाऱ्या डॉक्टर व कर्मचारी यांच्यापण आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. यावर आरोग्य प्रशासन लक्ष देण्याची गरज आहे.