

The path to prosperity was found through mushroom production.
घनसावंगी, पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील बानेगाव येथील ज्ञानेश्वर जंगले या शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीला निसर्गाची साथ मिळत नसल्याने मशरूम (अळिंबी) निर्मिती करण्याची शेती सुरू केली आहे, आपल्या शेतात असणाऱ्या शेडमध्ये कमी खर्चात उत्पन्नाचा चांगला स्रोत मिळत असल्याने ग्रामीण भागातील शेतकरी त्यांची मशरूम शेती बघण्यासाठी गर्दी करताना दिसून येत आहेत.
बाजारपेठेत मशरूमला चांगली मागणी असल्याने त्यांना ५० वाफ्यातून (बेड) सरासरी ६० किलो मशरूम मिळत आहे. तसेच ४०० रुपये किलोला भाव असल्याने २२ हजार रुपये उत्पन्न मिळत आहे. आणि ते देखील खर्च कमी आणि केवळ २५ दिवसांत जास्तीचे उत्पन्न मिळत आहे.
तालुक्यातील बहुतांश शेतकरी कपाशी, सोयाबीन, तूर हे पारंपरिक पिके घेत असतात. मात्र हे पीक घेत असताना नेहमी उद्भवनाऱ्या नैसर्गिक आपत्तीने शेतकरी कर्जबाजारी होत आहे. कारण तालुक्यातील पावसाच्या अनियमितता, दुष्काळी परिस्थिती, अतिवृष्टी यामुळे शेतकऱ्याची पिकांवर केलेला खर्च देखील वसूल होत नाही. त्यामुळे बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन कृषी प्रक्रिया उद्योगाकडे वळण्याचा विचार करून अळिंबीची (मशरूम) शेती करण्याचा विचार केला. मशरूमची आवड असल्याने बाजारपेठ व ग्राहकांची गरज ओळखून स्वतःकडे असणाऱ्या शेडमध्येच मशरूम वाफा (बेड) तयार करून उत्पन्न घेण्यास सुरुवात केली.
सुरुवातीला मशरूम वाफा (बेड) विषयी अडचणी आल्या. मात्र, कृषी विभागाकडून माहिती समजावून घेऊन हळूहळू बारकावे लक्षात आले. आणि सप्टेंबर २०२४ पासून मशरूम निर्मितीला सुरुवात केली. गव्हापासून तयार होणारा भुस्सा आणून त्याचे निर्जंतुकीकरण केले जाते. आणि वाफा (बेड) बनविण्यात येऊन मशरूम निर्मिती केल्या जाते. एक किलो कोरड्या भुश्यापासून तीन किलोचा बेड तयार होतो. पाणी फवारल्यामुळे त्याचे वजन वाढते.
त्यावर मशरूम बियाण्याची (स्पॉन) लागवड होते. आणि सुमारे २५ दिवसांनी मशरूम तयार होते. यातील पहिले १८ दिवस बेड उबदार आणि अंधाऱ्या जागेत ठेवले जातात. त्यानंतर मोकळ्या, खेळती हवा असलेल्या जागेत 'ग्रोइंग रूम'मध्ये हलवले जातात. सात दिवसांनंतर ते काढणीस येतात. प्रति बेड एक ते दीड किलो उत्पादन मिळते. जागेचे तापमान २२ ते २८ अंश सेल्सिअस दरम्यान ठेवावे लागते. त्या अनुषंगाने वर्षभर उत्पादन घेता येऊ शकते.